नात्यांची गोष्ट : भाग ४: तू आणि मी


इंजिनीरिंग संपवून मंजिरी अमेरिकेला निघून गेल्यानंतर माझी अवस्था जराशी सैरभैरच झाली होती. हृदयातील सल इतक्या सहजासहजी निघणारी नव्हती. मला मंजिरीबद्धल आकर्षण होतं का प्रेम होतं याचं उत्तर तेव्हा मला माहित नव्हतं. परंतु तिच्या निघून जाण्याने एक पोकळी मात्र नक्कीच निर्माण झाली होती.

ती गेल्यावर देखील काही दिवस आमचा एकमेकांशी संपर्क होता पण तो हळूहळू कमी होत गेला. ती तिच्या कामात मग्न झाली होती. मी देखील जॉब करत होतो. या सर्व काळात रवि आणि मृणाल नेहमी माझ्या बरोबर होते. काही दिवसातच आम्ही आमच्या जॉब्सना रामराम करून आमची सॅाफ्टवेअर फर्म लाँच केली, आणि त्यानंतर जे काही आम्ही कामात बुडालो ते अजूनही बुडालेलोच आहोत. नंतर मंजिरीचे शौनकशी लग्न झाले. जरी ते बिझिनेस मॅरेज असले तरी शौनक चांगला मुलगा आहे. जेव्हा मंजिरीच्या गाण्याच्या कार्यक्रमासाठी मंजिरी आणि शौनक भारतात आले होते तेव्हा आमचे सर्वांचेच शौनक बद्धल चांगले मत झाले होते.

सॅाफ्टवेअर फर्म लाँच केल्यानंतरचे दिवस खूपच हेक्टिक होते. मी आणि मृणाल सॅाफ्टवेअर डेव्हलपमेंट करत होतो आणि रवि मार्केटिंग साठी जगभर फिरत होता. श्वास घ्यायला देखील उसंत नव्हती. जीवनाला वेगळी कलाटणी तेव्हा मिळाली जेव्हा अदिती माझ्या आयुष्यात आली. त्यावेळी ती आर्ट स्कूलमधून पदवी घेऊन एका जाहिरात फर्म मध्ये काम करत होती. ही फर्म एखाद्या कंपनीचे पूर्ण मार्केटिंग पॅकेज बनवून देण्याचे कॉन्ट्रॅक्ट घेत होती. यामधे कंपनी लोगो, लेटरहेड्स, प्रॅाडक्ट इन्फॅार्मेशन मटेरीअल, व्हिजिटिंग कार्ड्स पासून ते वेब पेज बनविण्यापर्यंत सर्व कामांचा समावेश होता. यानिमित्ताने माझ्या आणि अदितीच्या खूप मीटींग्स होत होत्या, आणि मि. अशोक आणि मिस. आदितीवरून आम्ही तू आणि मी वर कधी आलो ते आमचे आम्हालाच कळले नाही.

अदिती जरी कन्व्हेन्शनली सुंदर नसली तरी एक परिपूर्ण स्त्री होती. तिचं वागणं, बोलणं, तिचा ड्रेसिंग सेन्स आणि तिचं नॉलेज, या सर्वांचं एक आकर्षक कॉम्बिनेशन बनलं होतं. म्हणूनच आज पन्नाशीतही सर्वांच्या नजरा आपल्याकडे वळविण्याचे सामर्थ्य तिच्या पर्सनॅलिटित अजूनही आहे. मीच काय, कोणताही पुरुष तिच्या प्रेमात पडला असता. पण सर्वाना सोडून ती माझ्याकडे का आकर्षित झाली हे कोडं मला अजूनही सुटलेलं नाही.

मला वाटतं, की स्त्री अथवा पुरुष, दोघांच्याही मनात एक न्यूनगंड असतो. इतरांना आपल्याबद्धल काय वाटतं हा प्रश्न कायमच पडलेला असतो. आपल्याला स्वतःचा कमीपणाच नेहमी जाणवत असतो. माझ्याबद्धल इतरांना काहीही वाटो, मला फरक पडत नाही अशी वृत्ती फार कमी लोकांच्यात असते. या न्यूनगंडामुळेच बहुतेक जगातील निम्म्याहून अधिक प्रेमप्रकरणं एकतर्फी रहात असावीत. “आग दोनो तरफ बराबर लगी है”, हे ओळखायचं कसं? आमच्या रव्याचेच उदाहरण घ्या ना! पण तिथे कळ दोन्हीकडे लागली होती हेही तितकेच खरं!

अदितीच्या सहवासात गेली पंचवीस वर्ष कशी गेली ते समजलेच नाही. लग्नानंतर अदितीने जॉब सोडून अनिल बरोबर तिचा स्वतःचा ‘द स्टुडिओ’ सुरु केला. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आम्ही फिरून जवळजवळ अख्ख जग बघितले. आदितीला माझ्या एव्हढीच फिरण्याची आवड आहे. आणि मृणाल व रवि कायम आमच्या बरोबर असायचेच.

विन्या आणि कालिंदीच्या जन्मानंतर आयुष्य थोडं स्लोडाउन झालं खर पण त्यातही वेगळीच मजा होती. त्या दोघांना वाढविताना आम्ही एक वेगळाच आनंद उपभोगत होतो. मी आणि अदिती अजूनच एकमेकांच्या जवळ आलो. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालो होतो आम्ही!

आता मला जाणवतं की मला मंजिरीबद्धल जे वाटलं ते एक आकर्षण, इन्फ़ॅचुऐशन होतं. कारण खरं प्रेम वाटण्याकरीता त्या माणसाचा दीर्घ सहवास असावा लागतो. प्रेम ही क्षणात होणारी गोष्ट नाही.

आज आयुष्याच्या या वळणावर आम्ही सुरक्षित जागी पोहोचलो आहोत. मुलं स्वतंत्र झाली आहेत. जबाबदाऱ्या बऱ्याचशा कमी झाल्या आहेत. एकमेकांच्या सहवासात वेळ घालवायला आज पूर्ण संधी आहे. किंबहुना अशी एक वेळ येऊ घातली आहे की आमचे अस्तित्व तू आणि मी मधेच गुंतले आहे. मित्रमैत्रिणींची गरज नाही असं नाही. पण एकमेकांच्या सहवासाचीच जास्त जरुरी भासते.

माणूस जन्माला येतो, आयुष्यात अनेक नाती जगतो, मित्रमैत्रिणीत रमतो, पण आयुष्याच्या शेवटी एकच नातं शिल्लक रहातं आणि ते म्हणजे, तू आणि मी.

Comments

Very True in real life . And a reality too

By : Cyril David
09/05/2023 12 : 46 : 51 PM

नात्यातील गोडवा छानपणे उलगडून दाखवला आहे.

By : Pratibha Tarabadkar
09/05/2023 6 : 36 : 26 PM

अप्रतिम.....

By : समीर पेशवे
11/05/2023 3 : 56 : 02 PM
Leave a comment
*Comment :
*Name :
Email :



Share This Article