आम्ही सूक्ष्मात जातो


आम्ही सूक्ष्मात जातो

शशांक पुरंदरे

परवाच एका शास्त्रज्ञाचे वक्तव्य वाचले की आपण मेल्यावर देखील सगळंच शून्य होत नाही. म्हणे आपला आत्मा जीवंत असतो. हे वाचल्यावर आमच्या ब्रेनमधे चक्रे सुरु झाली, आणि पाहतो तर काय, आम्ही खरंच मेलो होतो.

ही आमची बॅाडी समोर पडलेली होती. आजूबाजूला आमचे सर्व नातेवाईक मित्रमैत्रीणी मोक्याच्या जागा हेरुन बसलेले होते. आमचा आत्मा, हो म्हणजे आता त्याला दुसरं काय म्हणणार ना, वर हवेत तरंगत होता.

रुममधे बसायला जागा नव्हती. खिडकीतून खाली पाहिले तर बिल्डिंगसमोर देखील लोकं उभे होते. एक शववाहिनी येऊन थांबली होती. बहुतेक सर्वजण आता हे सर्व कधी उरकणार, अर्धा दिवस ॲाफिसमधे हजेरी लागली तर बरं, अशा आविर्भावात एकमेकांशी दबक्या आवाजात बोलत होते. शनिवार रविवारी गचकला असता तर एक सुट्टी तरी वाचली असती असाच एकंदर सूर होता. जणूकाही यांना जबरदस्ती पकडून आणले होते. भेटायला गेलो तरी कुणाच्या लक्षात नसते, पण गेलो नाही तर मात्र लोकांना आठवते हे मात्र खरं!

मला मरून दोनएक तास झाले होते, पण अजून डीसी मिळाले नव्हते. मी खिडकीतून अलगद तरंगत खाली उतरलो. माझे दोन मित्र एकमेकांशी हळू आवाजात बोलत होते.

“तसा माणूस बरा होता, पण आयुष्यात सगळे धंदे करुन झाले होते. शाळेपासूनच मुलींच्या मागे असायचा. त्या पद्माबरोबर लफडं होतं म्हणे!” वास्तविक ही पद्मा काळी का गोरी ते पण मला आठवत नव्हते. मी त्याला विचारायला जाणार तेव्हढ्यात लक्षात आले की आपण मेलो आहोत. आत्मा माणसाशी बोलू शकत नाही. खरंतर शास्त्रज्ञांनी यावर संशोधन केले पाहिजे, मग एकेकाला सरळ केले असते मी! या शहाण्याने दोन वर्षांपूर्वी माझ्याकडून दहा हजार रुपये उसने घेतले होते, ते आजतागायत परत केले नाहीत. पण आता त्याचा काही उपयोग नव्हता.

मी तरंगत परत वरती आलो. वर नातेवाईक ताटकळत बसलेले होते. किचनमधून सर्वांकरिता चहा आला. मलापण चहाची गरज होती, पण आत्म्याला कोण कसा चहा पाजणार?

माझ्या बॅाडीच्या नाकात, कानात कापूस घातला होता. वर चादर टाकली होती. पण माझ्या आत्म्याला अजिबात गुदमरायला होत नव्हते, आणि अगदी गुदमरलो तरी एकदा मेल्यावर परत थोडाच मरणार होतो मी! माणसं येऊन मधूनमधून फुलं वहात होती. किती हा फुलांचा अपव्यय!

शेवटी एकदाचे डीसी आले. लगेच माझी बॅाडी उचलून खाली नेण्यात आली. नेताना एकदा पडायचीच बाकी होती. खाली शववाहिकेत घालून स्मशानात नेली. घरी जमलेल्यांपैकी दहापंधरा जणंच मला जाळायला आले होते. पण ठीक आहे म्हणा. मी पण जिवंतपणी हेच केले होते.

सर्व सोपस्कार संपवून लोकं घरी परतली. माझा आत्मा मात्र हवेतच तरंगत होता. पण आता पुढे काय होणार ते मला, म्हणजे माझ्या आत्म्याला समजेना. माझ्या मित्रांची एकंदरीत संभाषणे ऐकून आत्म्याच्या आयुष्यात तेच करत रहायची मला अजिबात इच्छा नव्हती. अर्थात आत्म्याला आयुष्य असते का, आणि किती असते, की कायम असाच मी असाच तरंगत राहणार, काहीच समजत नव्हते.

पण अचानक माझा आत्मा एका बाईच्या पोटात शिरला. तो एका बालकाच्या जीवात शिरला. नंतरचे नऊ महिने मी पोटात फिरत वाढत होतो, आणि अचानक एक दिवस मला माझ्याच रडण्याचा आवाज ऐकू आला.

मला जाग आली तेव्हा बायको मला गदागदा हलवत म्हणत होती, अहो रडताय कशाला, काही स्वप्न पडलं का?

मी उठलो तर पोटावर वर्तमानपत्र पडले होते आणि समोरच त्या शास्त्रज्ञाची बातमी होती.

Comments
Leave a comment
*Comment :
*Name :
Email :



Share This Article