WhatsApp गप्पाः महिला विशेष


WhatsApp गप्पाः महिला विशेष

शशांक पुरंदरे

“हाय.” प्रियाने स्नेहाला WhatsApp वर मेसेज केला. सकाळचे दहा वाजले होते.

“हाय.” लगेच स्नेहाचा रिप्लाय आला.

“काय म्हणतेस? आत्ता फ्री झाले कामातून. सकाळी वेळच मिळत नाही. उठा, चहा, ब्रेकफास्ट, मुलांचे, नवऱ्याचे टिफिन, कामं संपतच नाहीत. तरी दोन बायका आहेत कामाला. पण सुपरव्हाईज करण्यातच दम निघतो. नाहीतर इतके पैसे देऊनही कामं नीट करत नाहीत गं! काय सांगू तुला. शेवटी दमून आत्ता कुठे बसले जरा! म्हटलं जरा तुझ्याशी चॅट करु. तेव्हढाच काय तो विरंगुळा. आणि तुझी आणि माझी मतं पण सारखीच असतात. बाकीच्या तर तुला माहितीच आहेत. प्रत्येकीला इगो आहे. दुसऱ्यांना बोलूनच देत नाहीत. माझं मात्र तसं नाही.”

“हो-“

“म्हणून मी फक्त तुझ्याशीच बोलते. अगं, तुला सागायचंच राहिलं, परवा मी नवीन हेअर स्ट्रेटनर घेतला. मस्त आहे. जरा महाग आहे. किंमत ऐकून अक्षय म्हणाला, माझे केस उभे राहिले स्ट्रेटनर न वापरताच!, मी म्हटलं, तू आठवड्यात सहा दिवस घराबाहेर असतोस. रविवारी दिवसभर तंगड्या वर करुन झोपा काढतोस. मग माझ्याशिवाय तुझे पैसे खर्च करायला आहे कोण दुसरं?”

“का तुझी मुलं-“

“मुली तसा हातभार लावतात, पण अजयला तर स्वतःचंच भरपूर आहे. पण मी काय म्हणते, पैसे खर्च नाही करायचे तर कमवायचे कशासाठी? आता बघं, नवरात्र येतंय. मी म्हटलं, गेल्या वर्षी घेतलेले सगळे ड्रेसेस आणि साड्या आऊट ॲाफ फॅशन झाल्या आहेत तेव्हा मी आता दहा नवीन साड्या आणि ड्रेसेस घेणार!”

“नवरात्री तर नऊच दिवस असते ना!”

“अगं तेच ते! मुलींनाही लागतील. मोठी मुलगी आता लग्नाची आहे. कधीकधी गरबा दांडियात चांगली मुलं सापडतात देखील.”

“हो ना. त्या श्रद्धाच्या मुलीचं नाही का-“

“ए तुला रीळं बनवता येतात का? मी मुलींना म्हटलं तर म्हणतात आम्हाला वेळ नाही शिकवायला! हल्ली किती छान रीळं येतात सोशल मिडियावर! पण या सेलिब्रिटी जरा आगाऊच आहेत हं! स्वतःच स्वतःला एक्पोज करायचं आणि इतरांना मग नावं ठेवायची स्टॅाक करतात म्हणून! परवा मी ब्लाऊज शिवला. जरा लो कट झाला तर अक्षय ओरडला मला!
माझं इंग्रजी जरा ब्रोकन ब्रोकन आहे. म्हणून ते सुधारायला मी इंग्रजी वेब सीरीज पाहते. खाली सबटायटल्स असतात म्हणून बरं, नाहीतर एक शब्दही कळत नाही काय बोलतात ते! किती तोंडातल्या तोंडात बोलावं! आणि तुला सांगू, या सीरीज मुलांबरोबर पाहणे कठीण! किती सेक्स आणि नग्नता दाखवतात गं! पण हल्ली मधेमधे त्या जाहिराती दाखवतात ना, त्यामुळे नवीन कॅास्मॅटिक्सची माहिती मिळते. या लोकांना नवनवीन मॅाडेल्स मिळतात बऱ्या! मी बरेच वेळा ते पाहून लिपस्टिक्स, फेसक्रीम वगैरे घेते म्हणा! आठ दिवसांत फरक जाणवतो म्हणे! मी गेले तीन महिने वापरते आहे. मी मधे पातंजलीची पण केशकांती की अशीच काहीतरी ॲड पाहिली, त्यात नाही का एखादी मॅाडेल पाण्यातून केस वर उडवत बाहेर येते. मी मोठ्या उत्सुकतेने पहात होते की कोण मॅाडेल आहे, पण पाहते तर काय, बाबा रामदेव केस उडवत बाहेर आले. आता बोल !!!
फेसक्रीमवरुन आठवण झाली, अकरा वाजता चांगले ब्युटिक मधे अपॅाईंटमेंट आहे माझी. हेअर कलर, हेअर स्ट्रेटनिंग, फेशियल, मॅनिक्युअर, पेडिक्युअर वगैरे. पाच एक तास लागतील बहुतेक! तसा स्ट्रेटनर आहे माझ्याकडे, पण अजून नीट वापरता येत नाही मला. सवय नाहीये अजून ना! बाकी सर्व ठीक ना! बरं वाटलं गं तुझ्याशी चॅट करुन! तुझीमाझी वेव्हलेंग्थ नीट जुळते. इतरजणी स्वतःचेच सांगत बसतात. पण तू तशी नाहीयेस. चल मला निघायला हवं, बोलू सावकाश निवांतपणे नंतर! बाय.”

Comments

😆😆 मला वाटतं अशी एक तरी मैत्रीण प्रतेक स्त्री ला असते.

By : Sheela Bahadkar
29/10/2026 09 : 58 : 38 AM
Leave a comment
*Comment :
*Name :
Email :



Share This Article