नात्यांची गोष्ट: भाग ३: मंजिरी


“अरे अशोक, आज एक फोन आला होता तुझ्यासाठी. कोणीतरी मिसेस देशपांडे बोलतेय म्हणाली.”
माझ्या ओळखीच्या निदान दहातरी देशपांडे आहेत.
”कोणी माझ्या क्लाएन्ट पैकी होतं का?”
“नाहीरे, मी ओळखते ना तुझ्या क्लाएन्टस् ना.”
“फोन नंबर दिला आहे का? एनी फर्स्ट नेम?”
“हो, नंबर दिला आहे. मंजिरी नाव आहे.”
मंजिरी! माझं मन तीस वर्ष मागे गेले.
“कोण रे ही मंजिरी? जुनी मैत्रिण वाटतं?”
“अग हो. मंजिरी! मंजिरी सबनीस.”
“पण नाव तर देशपांडे म्हणाली.”
“सबनीस तिचं आधीचं नाव होतं.”
“आधी कधी बोलला नाहीस तिच्याबद्धल! प्रेमात वगैरे होतास की काय तिच्या?” बायका त वरून ताकभात ओळखतात, आदिती त्याच्या पुढची पायरी आहे. काहीही लपून राहू शकत नाही हिच्यापासून.
“अग, ती मोठ्ठी स्टोरी आहे.”
“मग सांग ना! आज विन्या आणि निशू पण नाहीयेत आणि कालिंदी मैत्रिणींबरोबर सिनेमाला गेली आहे.”
“पण तिला माझा नंबर कोणी दिला?”
“रव्या, दुसरं कोण?”
“तुला माहितीये, मी आणि रवी इंजिनीयरिंगला एकाच कॉलेजला होतो. इंजिनीयरिंग कॉलेजेस मध्ये त्या वेळी मुलींचा दुष्काळाच असायचा. पूर्ण वर्गात जेमतेम दोन किंवा तीन मुली असायच्या. एफ. वाय. ला पहिल्याच दिवशी आमच्या टकल्या मास्तराने क्लास चालू केला आणि “मे आय कम इन सर?’ असं विचारून मंजिरी आत आली, आणि तुला सांगतो, अख्खा वर्ग एका क्षणात सामुदायिकपणे तिच्या प्रेमात पडला. मंजिरी म्हणजे अख्ख्या वर्गाला पडलेलं एक सुंदर स्वप्न होतं. इंजिनीयरिंगच्या वाळवंटातील एकमेव ओऍसीस होतं.”
“तुला काही लाज, बायकोसमोर दुसऱ्या मुलीची एवढी स्तुती? तू तर कविता करायला लागलासं!”
“मंजिरी होतीच तशी. तिच्यासारखे निळे डोळे मी कधीच पहिले नाहीत. इतकी छान हसायची. आणि हसल्यावर तिच्या डाव्या गालावर जी काही खळी पडायची की समोरचा माणूस त्यात बुडून जावा. तिचा आवाज तिच्या एवढांच सुंदर होता. खूप छान गायची ती. कॉलेज डेला तिने म्हटलेलं ‘या चिमण्यानो’ ऐकून अख्खा हॉल रडला होता.”
“एवढ्या मोठ्या वर्गात तुलाच बरी भेटली ही!”
“इंजिनीयरिंगच्या लॅबसाठी तिघा-तिघांच्या बॅचेस असत. नशिबाने मी, रव्या आणि मंजिरी एकाच बॅचमध्ये आलो. अख्खा वर्ग आमच्याकडे असूयेने बघत होता. आणि रव्या तर तुला माहितीच आहे. चार वर्षात कॉलेजमध्ये सर्वात जास्त फ्यूज रव्याने उडवले होते. इंजिनीयरिंग कॉलेजमध्ये अजून एक अलिखित नियम असतो. प्रॅक्टिकल्सना मुली फक्त बाजूला उभ्या राहून पहाण्याचं काम करतात. त्यामुळे रव्या आणि मंजिरी, दोघांचीही जबाबदारी माझ्यावरच आली.”
“म्हणजे प्रॅक्टिकली तू तिच्या प्रेमात पडलास?” आदितीचा सेन्स ऑफ ह्युमर म्हणजे कठीण आहे.
“तसं तर मग मी रव्याच्या पण प्रेमात पडायला हवं.”
“तो तर तू अजूनही आहेसच. पण काहीही म्हण, रव्या म्हणजे एक मस्त माणूस आहे. फक्त तो मुलगी नाही एवढंच. पण ते जाऊदे. विषयांतर नको. मंजिरी!”
“आम्ही चार वर्ष खूप धमाल केली. मी, मंजिरी, मृणाल आणि रव्या कायम एकत्र असायचो.” मृणाल म्हणजे रव्याची बायको. तिची एक वेगळीच कथा आहे.
”अभ्यास, नाटक, सिनेमे, क्रिकेटच्या मॅचेस काही विचारू नकोस. मंजिरीला क्रिकेट खूप आवडायचं आणि समजायचं देखील! व्हिव रिचर्डस तिचा फेवरीट होता. रात्र रात्र जागून आम्ही गाण्यांचे कार्यक्रम पाहायचो.
आम्ही तिघांनीही फायनल एक्झॅम क्रॅक केली. मला मुंबईत जॉब मिळाला. मंजिरीच्या वडिलांचा इलेक्ट्रॅानिक्सचा व्यवसाय होता. तिने मला जॉब ऑफर पण दिली होती. पण माझं स्वत्व आडवं आलं. तिच्या हाताखाली काम करणं मला शक्य नव्हतं. त्यामुळे, तुझ्याच भाषेत, आम्ही प्रॅक्टिकली वेगळे झालो.
नंतर देखील आम्ही काही दिवस एकमेकांच्या संपर्कात होतो. पण मग मंजिरीच्या वडिलांचा व्यवसाय अजून वाढला आणि ती सिलिकॉन व्हॅलीमध्ये सेटल झाली. त्यानंतर आज इतक्या वर्षांनंतर तिचा फोन आला.”
“व्हॉट अ लव्ह स्टोरी!” आदितीने माझी पाठ थोपटली. “आपण मूव्ही काढू शकतो. शाहरुखला घेऊया. आणि काजोल!”
“आणि अदितीच्या खलनायकी भूमिकेत उर्मिला!”
“नालायक माणसा, मी तुझी खरी हिरोईन आहे. जाऊदे, कधी फोन करतोस तिला? तुझ्यापेक्षा मलाच जास्ती उत्सुकता आहे.”

दुसऱ्या दिवशी मंजिरीच आमच्याकडे आली आणि येताना तिच्या वडिलांना बरोबर घेऊन आली. ती घरात शिरताना मला तिची कॉलेजमधली एंट्री आठवली. अजूनही तिच्यात काहीच फरक पडला नव्हता. तेच डोळे, तेच हास्य आणि तीच डाव्या गालावरील खळी! मंजिरीने आल्या आल्या मला मिठीच मारली. तिच्या डोळ्यात पाणी तरळलं होतं.

तिने बाबांची आणि मी आदितीची ओळख करून दिली.
“तू होतास तसाच आहेस.” मंजिरी म्हणाली.
“तू पण काही बदलली नाहीस.” मी.

जेव्हा मंजिरी सिलिकॉन व्हॅली मध्ये त्यांचा चिप डिझाईनचा व्यवसाय विकसित करत होती तेव्हा मी एम्बेडेड सॉफ्टवेअर प्रणाली विकसित करत होतो. आता मंजिरीला माझ्या मदतीची गरज निर्माण झाली होती. आम्ही एकमेकाना मदत करण्याचा निर्णय घेतला.
निघताना मंजिरी आदितीचा हात हातात घेऊन म्हणाली, “ तू अतिशय भाग्यवान आहेस, तुला अशोक सारखा साथीदार मिळाला. सांभाळ त्याला. भेटू लवकरच.”

रात्री अदिती जरा गप्पगप्पच होती. मलाही काय बोलावं ते सुचत नव्हतं. आमची दोघांची नजरानजर झाली आणि जे ओठावर येत नव्हतं ते नजरेने व्यक्त झालं.
मंजिरी भारतात एक मराठी गाण्याच्या रियालीटी शो मध्ये भाग घ्यायला आली होती. ती अजूनही गाते. दुसऱ्याच दिवशी तिच्या शोचा टेलीकास्ट झाला. तो बघायला मंजिरी माझ्याच घरी आली. बरोबर शौनक, तिचा नवरा पण होता. आम्ही रव्या, मृणालला पण बोलाविले होते. कित्येक वर्षानंतर तिचं “या चिमण्यानो” परत ऐकायला मिळाले. अजूनही तिचा आवाज तितकाच गोड आहे. आमचे डोळे परत पाणावले नसते तरच नवल!

Comments

पुढे काय झालं याची उत्सुकता वाढली आहे.

By : Pratibha Tarabadkar
08/05/2023 11 : 05 : 43 AM

शशांक, तुझे लिखाण इतके पारदर्शक आणि बारकावे टिपणारे आहे की,तु एकेक प्रसंग जणु पिक्चर सारखे डोळ्यापुढे उभे करतोस.मस्त

By : हेमांगी
09/05/2023 2 : 12 : 52 PM

वाह.... सुंदर कथा आहे....

By : समीर पेशवे
10/05/2023 3 : 30 : 08 PM

वाचताना अगदी प्रत्यक्ष समोर चित्रपट उभा करतोस!!! तूझी लिखाणाची अगदी सहज शैली आहे. मजा येते वाचताना... उत्सुकता वाढते

By : SHEETAL SURESH KHIRE
13/05/2023 4 : 16 : 26 PM
Leave a comment
*Comment :
*Name :
Email :



Share This Article