त्याचे व्यवच्छेदक लक्षण


“आता हे भजं घ्या”. आमोद म्हणाला.
“मला नको. मी खूप खाल्ली आहेत आत्तापर्यंत. करता करता खातच होते.” उमा म्हणाली.
“अहो वहिनी, तसं नाही. ही खेकडा भजी कशी बनवतात? आधी कांदा उभा चिरायचा. मग त्याचे लांब काप करायचे एकसारखे. मग त्यावर बेसन टाकायचं. मग एकत्र करून त्यात तिखट मीठ वगैरे टाकून पाणी सुटले की भजी तळायची. यात सर्वात महत्वाची गोष्ट कुठली?”
“कुठली?”
“हीच की ते बेसन सगळ्या बाजूने एकसंधपणे कांद्याला लागले पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे बेसनात तिखट, मीठ योग्य प्रमाणात एकसंधपणे मिसळले पाहिजे. आणि नंतर तेलात टाकल्यावर सर्व बाजूने व्यवस्थित तळले गेले पाहिजे.”
“हे सर्व तुम्ही मला का सांगता आहात? गेले कित्येक वर्ष मी भजी तळते आहे.” उमा वैतागून म्हणाली.
“माझ्या म्हणण्याचा अर्थ एकच आहे. कुठलेही काम एकसंधपणे झाले तरच ते व्यवस्थित होते.” आमोद असे म्हणून ते भजं तोंडात टाकले. “आता भोजं खॉताना देखील सर्र्व भाजुने नीट छावले गेले पॉहिजे.” आमोद खाता खाता म्हणाला.

आमोदचा हाच प्रॉब्लेम आहे. कुठल्याही गोष्टीची सर्वांगाने चिकित्सा केल्या शिवाय त्याला चैनच पडत नाही. आमोदची आणि माझी भेट बीएच्या पहिल्या वर्षी झाली त्यानंतर गुळाला मुंगळा चिकटावा तसा मला चिकटला तो कायमचाच. तसा स्वभावाने चांगला आहे. फक्त कुठल्याही गोष्टीचे मुळापासून विच्छेदन करणे ही त्याची सवय अतिशय वात आणते कधीकधी.

“घ्या, चहा घ्या.” उमाने चहाचा कप आमोदसमोर ठेवला.
“वाहिनी, आता हा चहाचा कप बघा.” आमोद म्हणाला.
“इश्य, त्यात काय बघायचंय?”
“बघा म्हणजे तसे नव्हे. हा चिनी मातीपासून बनलेला आहे आणि त्याला एक कान आहे ज्याला धरून आपण कप उचलतो.”
“बरं मग?”
“आपण या कानात बोट घालून कप उचलतो तेव्हा जर कानाचे भोक लहान असेल आणि चहा खूप गरम असेल आणि उचलताना बोट जर कपाच्या कडेला लागले तर बोट भाजते. म्हणून विकत घेताना भोकात बोट घालून भोक मोठे आहे याची खात्री करून घावी आणि मगच कप विकत घ्यावा.”
“अय्या, भावजी तुम्ही खरंच ग्रेट आहात. ही गोष्ट कधी माझ्या लक्षातच आली नाही.”
“कपावरून आठवण झाली. आम्ही कॉलेजमध्ये असताना आमच्या वर्गात एक मुलगी होती.”
“एकच?”, उमा म्हणाली, “बीएला तर फुलांचे ताटवेच असतात.” उमा पण काही कमी नाही.
“वाहिनी तसं नाही. पण मी एका विशिष्ट मुलीबध्दल सांगतोय. तुम्ही मधेमधे बोलू नका हो. माझी लिंक तुटते. तर काय सांगत होतो मी?”
“फुलांचे ताटवे.” मी म्हणालो.
“हं? नाहीरे. तर आमच्या वर्गात एक मुलगी होती. दिसायला सुंदर, गोरीपान, काळेभोर लांबसडक केस, कपाळावर लाल कुंकू, नाजुक जिवणी, अपरं नाक, कानात हलणारे डूल, गळ्यात नाजुक सोनसाखळी-”
“पुरे. नुसतं सुंदर म्हटलं की त्यात सर्व आलं. बाकी वर्णनाचा काही संबंध आहे का तुझ्या कथेशी?” मी.
“गप रे. तर, तिची चहा प्यायची विशिष्ट सवय होती. आपण नेहमी उजव्या हाताने कप उचलून चहा पितो. पण ती डावखरी नव्हती तरी डाव्या हाताने कप उचलायची. का विचारा?”
“मी का विचारू??” उमा.
“म्हणजे?”
“मी का, का विचारू? तुम्ही तसंपण सागांलच ना?” उमा पण मधूनच आमोदची विकेट काढते.
“हं?”, एक क्षण आमोदला काय बोलावे ते कळेना. “कारण चहा पिताना इतर सर्वांचे ओठ चहाच्या एकाच बाजूला लागतात. म्हणून ती नेहमी दुसऱ्या बाजूने चहा प्यायची.” आमोदने कपातील उरलेला चहा संपवून गोष्ट संपवली.

हा विच्छेदन करण्याचा आमोदचा पहिल्यापासूनच स्वभाव आहे. जर स्वारी चुकून मेडिकलला गेली असती तर शवविच्छेदनात पैकीच्यापैकी मार्क मिळवले असते. मला आणि उमाला आता याची सवय झाली आहे. पण कधीतरी याची ही सवय अंगावर येते.

“आता या राजाकडे पहा.” आमोदने परत सुरुवात केली.
“त्यात काय पहायचंय? रोजच तर पाहते.” उमा.
“अहो वाहिनी, तसं नाही. वयाच्या तिसाव्या वर्षी याचे तुमच्याशी लग्न झाले. असतं एकेकाचे नशीब.”
“म्हणजे, तुम्हाला म्हणायचंय काय?” उमा जरा चिडूनच म्हणाली.
“कॉलेजात कितीतरी मुली याच्या मागे होत्या. पण नाही, साहेब अभ्यासात मग्न होते तेव्हा. तेव्हाच्या तेव्हा लग्न झालं असतं याचं.”
“आणि खाल्लं काय असतं? शिक्षण आहे म्हणून मी आज एका बँकेचा मॅनेजर आहे. आणि इतर सर्व मुलींपेक्षा उमा नक्कीच उजवी आहे.”
“धन्यवाद.” उमा नाटकी आविर्भावाने म्हणाली. “पण भावजी, आपलं काय?” आता व्यवच्छेदकाचे काम उमाने सांभाळले होते. “अजूनही तुम्ही मुलींच्या मागे पळताय, पण कोणी सापडत नाहीये.”
“कसं आहे, मी एक दर्जा ठरवलेला आहे. त्या दर्जाची मुलगी मिळत नाही तोपर्यंत माझे संशोधन चालू राहिलं.”
“संशोधन की सौशोधन???” उमाने चौकार मारला.
“दोन्हीही.”
“तुम्हाला कशी मुलगी पाहिजे?”
“हं! योग्य प्रश्न विचारलात वाहिनी तुम्ही. आता मी बत्तीस वर्षांचा आहे. म्हणजे मुलगी साधारण सत्तावीसची असली पाहिजे. त्यापेक्षा लहान असली तर मॅच्युरिटी कमी असते, आणि जास्ती असली तर खूप आखडू असतात स्वभावाने. दिसायला सुंदर असावी.”
“स्वत:चे आरशात तोंड पाहिलंय का कधी?” मी.
“उंची पाच तीन किंवा पाच चार असावी.” माझ्याकडे दुर्लक्ष करून आमोद म्हणाला.
“हिल्स सकट की कोल्हापुरी घालून?” मी पण कमी नाहीये.
“तू थांबरे. केसांची लांबी एक फूट तरी असावी. आणि मग ग्रॅज्युएट, चांगल्या पगाराची नोकरी, घराची जबाबदारी नसावी, वगैरे वगैरे.”
“मी मधे अनुरूपची वेबसाईट पाहत होते. तुमच्या योग्य खूप मुली आहेत त्यावर.”
“अच्छा, मग बघू आपण.”
“फक्त एकच प्रॉब्लेम आहे.”
“कोणता?”
“त्यांना तुमच्यासारखाच नवरा हवा, पण पगार मात्र सहा आकडी असला पाहिजे. लग्नानंतर नोकरी करणार नाही आणि पाहिजे तसा खर्च करता आला पाहिजे.”
“बघितलंत वाहिनी. हे जग असेच आहे हल्लीचे. सर्वजण ऐषारामी झाले आहेत. माझ्या सारख्या सामान्य माणसाने काय करायचे?” आमोद उद्वेगाने म्हणाला.
“सोपं आहे”, उमा म्हणाली, “आपल्या स्वत:च्या अपेक्षा कमी करायच्या. म्हणजे सगळे व्यवस्थित होईल. म्हणजे पाच तीन ऐवजी पाच फूट उंची, केसांचा बॉब असला तरी चालेल, अगदी सुंदर नसली तरी ठीकठाक असावी वगैरे वगैरे.”
“एकंदरीत सर्व कठीणच आहे!”. आमोद डोक्यावरून हात फिरवत म्हणाला.
“दुसरा एक उपाय आहे.”
“कोणता?” आमोद.
“तुम्ही सहा आकडी पगार देणारी नोकरी शोधा. मग सर्वकाही ठीक होईल.”
“बीए पास क्लासला कोण सहा आकडी नोकरी देणार?” निराशा आमोदाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.
“जाउदेरे. एव्हढा विचार करू नकोस. आपण शोधू कुणीतरी.” मी आमोदला धीर दिला. “जेवायला थांब आलाच आहेस तर. आज उमाने मटारची उसळ आणि केळ्याची शिकरण केली आहे.” मी पुणेरी माणसाच्या अविर्भावात आमोदाला निमंत्रण दिले.

आमोद जेवायला थांबला खरा, पण त्याच्या डोक्यात कुठे तरी विचारांचा भुंगा भणभणतो आहे हे आम्हाला दिसत होते.

Comments

चिकित्सक...हाहाहा

By : हेमांगी प्रदीप कुलकर्णी
19/01/2024 1 : 50 : 08 PM

असतात अशी काही बोरींग माणसं...बाल के खाल निकालनेवाले! बाकी लिखाण विनोदी

By : Pratibha Tarabadkar
19/01/2024 2 : 08 : 48 PM
Leave a comment
*Comment :
*Name :
Email :



Share This Article