सवंग लोकप्रियता, लोकशाही, दुर्घटना वगैरे वगैरे


सवंग लोकप्रियता, लोकशाही, दुर्घटना वगैरे वगैरे.

शशांक पुरंदरे

गेल्या दोनचार दिवसात चर्चा कराव्या अशा बऱ्याच घटना घडून गेल्या.

परवा किरकोळ वादातून रेल्वे मधे एकाने दुसऱ्याचा खून केला, ते देखील सर्वांच्या देखत! कुणीही मदतीला धावून गेले नाहीत . फक्त व्हिडीओ बनवत राहिले असे नेहमीप्रमाणे सहप्रवाशांवर आरोप झाले. वृत्तपत्रात लगेच अग्रलेख लिहून संपादकांनी, जे कधी अशा गर्दीच्या वेळी गाडीत शिरण्याचा विचारही करत नाहीत, सहप्रवासी, रेल्वे प्रशासन, आत्ताचे सरकार यांना शिव्यांची लाखोली वाहून आपली इतिकर्तव्यता पूर्ण केली. संपादकांना चघळायला विषय मिळाला.

आता तुम्ही म्हणाल की या विषयावर लिहून मी देखील तेच करतोय. पण तसे नाहीये.

मी सदोतीस वर्ष रेल्वेचा जीवघेणा प्रवास केला आहे. क्षुल्लक कारणांवरून रक्त येईपर्यंत झालेल्या मारामाऱ्या पाहिल्या आहेत. अशा वेळी फक्त हिंदी सिनेमाची सुपरहिरोच फक्त मधे पडू शकतो. इतर कुणीही मधे पडला तर तो देखील फक्त मार खातो, त्यामुळे चाकू सूऱ्यांच्या मारामरीत मधे पडणे म्हणजे मूर्खपणा आहे.

अशा वेळी व्हिडीओ मात्र काढले जातात. तेच व्हिडीओ आणि छायाचित्रे वृत्तवाहिन्या आणि वर्तमानपत्रे चवीने वापरतात. तेव्हा त्यांना याबद्दल लिहिण्याचा वा बोलण्याचा काहीही हक्क नाही. हा सवंग लोकप्रियतेचाच एक भाग आहे.

ज्या गर्दीत टीसी देखील कधी चढू शकत नाही तिथे सुरक्षारक्षक ठेवण्याची मागणी केवळ हास्यास्पद आहे.

आपले राजकारणी म्हणजे कधी असे काही घडतंय याची वाटच बघत असतात. लगेच आरोपी आणि बळी पडलेल्या माणसाच्या घरी पोहोचतात. हे त्यांच्या घरी जात आहेत हे त्यांच्या आवडत्या वृत्तवहिनीला आधीच कळविलेले असल्यामुळे त्यांचे कॅमेरे आधीच लावून तयार असतात. सवंग लोकप्रियता?

मुंबईतील गर्दी कमी करणे हाच यावर एक उपाय होता.त्यासाठी नवी मुंबई तयार झाली. परंतु सरकारने जर त्याच वेळी आपली कार्यालये तिथे हलवली असती तर ही वेळ आली नसती कदाचित! पण लक्षात कोण घेतो?

लोहगडावरुन प्रियकर प्रेससीने नवऱ्याला ढकलून मारले, यावरही वृत्तपत्रे रकाने भरत आहेत आणि वृत्तवाहिन्या तीच तीच दृश्ये परतपरत दाखवत आहेत. काय म्हणूया याला? पत्रकारिता??

कधी एकदा पाऊस पडतो, कधी मिलन सबवे तुंबतो आणि कधी आपण हे दृश्य दाखवतो यावर वाहिन्यांची चढाओढ असते. यांची म्हणजे पाऊस पडला तरी चांदी, नाही पडला तरी चांदी!!

आंतरराष्ट्रीय योग दिवशी लक्षात राहतात ते फक्त पोट सुटलेले मंत्री व राजकारणी! सामान्य माणसाला विचारतो कोण?

मी रोज वर्तमानपत्र विकत घेतो. पण का घेतो असा प्रश्न मला वारंवार पडू लागला आहे. रद्दीच्या पैसे मात्र बरे मिळतात.

सकाळी मी न चुकता पंधरा वीस मिनिटे मराठी बातम्या पाहतो ते केवळ आजूबाजूला काय चालले आहे ते कळण्यासाठी! काय चालू वा बंद आहे ते समजते. पण सध्या कोण कुठल्या पक्षात आहे तेच कळत नाही

मुंबई टाईम्स मात्र नेहमी वाचावा. त्यातून आपण कधीही न पाहिलेल्या हिरो व हिरॅाईनची नावे समजतात. कुठलीही गोष्ट नीट करण्याचे पाच ते सात उपाय समजतात. कसे कुणावर प्रेम करावे, कसा ब्रेकअप करावा, कसा व्यायाम करावा, कसे पदार्थ बनवावे याच्या अनेक पध्दती समजतात. कोण प्रेग्नंट आहे, कुणाचे जमले वा तुटले वगैरे गोष्टी समजतात व सामान्यज्ञान वृध्दिंगत होते.

पण मला सांगा, या सर्व गोष्टींना सवंग लोकप्रियता म्हणावे की नाही???

Comments

आम्ही पण एक सवय म्हणून पेपर वाचतो आणि रोज वैतागून म्हणतो, सगळ्या negative बातम्या.जगात चांगलं काही घडतच नाही का?पण काय करणार आदतसे मजबूर. माझा पण Bombay Times आवडता.Glossy paper with colourful news.Beautiful but unknown hero heroines with strange names and surnames....Just timepass!

By : Pratibha Tarabadkar
26/06/2026 11 : 15 : 53 AM

कटु वास्तव आहे

By : Hemangi Pradeep Kulkarni
26/06/2026 11 : 18 : 33 AM
Leave a comment
*Comment :
*Name :
Email :



Share This Article