आवाजाची दुनिया


आवाजाची दुनिया

शशांक पुरंदरे

कधीकाळी पु ल देशपांडे यांनी या विषयावर लेख लिहिला होता, पण त्यांनी ऐकलेले आवाज आणि सध्या ऐकू येणारे आवाज यात खूप फरक आहे.

आता मोबाईलचे आवाज बघा ना, माफ करा, ऐका ना, असं म्हणायला, माफ करा, लिहायला हवे वास्तविक! ऐ बाबा, उठ, फोन घे, या तुमच्या नकळत कारट्याने ठेवलेल्या कॅालर ट्यून पासून ते नॅार्मल पण विविध रिंगटोन पासून अनेक गाण्यांच्या रिंगटोनपर्यंत विविध आवाज फोन केल्यावर कानी पडतात. काही गाणी तर समोरच्याने फोन उचलूच नये असे वाटावे इतकी छान असतात तर काही बाईंला जपून दांडा धरायला पण सांगतात. बरं, फोन केल्यावर समोरच्या माणसाचा आवाज ऐकू येईलच याची शाश्वती नसते. सभी लाईने व्यस्त है पासून phone is temporarily disconnected पर्यंत काहीही कानावर पडू शकते. काही वेळा काहीच आवाज येत नाही, तर काही वेळा समोरची व्यक्ति, जी अदृश्य असली तरी आवाजी स्वरुपात असते, मी पांच मिनिटांत तुला परत फोन करतो असे सांगून पुढील पाच दिवस फोन करत नाही. कधी शेजारी फोनवर जोरजोरात बोलत असतो, इतका की त्याला फोनची काय गरज आहे असा विचार कधीतरी मनात येतो. कधीकधी आपल्याच फोनची रिंग वाजत नाही, तर आपण झोपल्यावर हमखास रिंग वाजते.

आज जर पु ल असते तर त्यांनी या विषयावर नक्की सातआठ पानी लेख लिहिला असता, आणि माझा कोणी वाचला नसता. आत्तादेखील वाचतील की नाही ते माहित नाही कारण वाचनकला सध्या मरणासन्न अवस्थेत आहे. सध्या आवाजच चालतो, म्हणून हा लेख आवाजी सुरुवात देखील उपलब्ध करुन दिला जात आहे.

हल्ली संसदेत बरेच ठराव आवाजी मतदानाने संमत केले जातात. यात हो किंवा नाही यात मोठा आवाज कुणाचा हे कसे ठरवतात हे मला न उमजलेले कोडे आहे.

पण मनाला आनंद देणारे इतरही आवाज आहेत. लताचे मधुर गायन, आशाचा लाडिक आवाज, रफीचा गोड आवाज आणि किशोरचा मर्दानी आवाज नेहमीच आपल्याला मोहिनी घालतो. या आवाजांवर देखील एक स्वतंत्र लेख लिहिता येईल, पण तो माझा प्रांत नव्हे.

मला अनेक वेळा किंगफिशरच्या शीळेनी पहाटे जाग येते. याला फूटबॅाल मॅचचा रेफरी केला तर वेगळ्या शिटीची गरज पडणार नाही. इतरही पक्षांचा किलबिलाट नेहमी कानावर पडतो.

काही जणं कुत्री पाळतात. त्यांचा (म्हणजे कुत्र्यांचा, गैरसमज नसावा) भुंकण्याचा आवाज कधीही रात्री अपरात्री देखील कानावर पडतो. कधी रस्त्यावर कुत्री तारस्वरात भुंकत असतात. मांजरी मात्र, मी येऊ? एव्हढेच विचारतात.

कधीतरी कल्हईवाला, धारवाला देखील येऊन आवाज देतात. अंडीपाव वाले सायकलची घंटा वाजवून सूचना देतात. इडली विकणारे देखील सायकलवरुन येत असत. हल्ली ही जमात नाहीशी झाली आहे. आमच्या इथे कधीतरी वासुदेव देखील हजेरी लावतो. बासरीवाला मधुर गाणी ऐकवून जातो. आमच्या आधीच्या सोसायटीत तर भेळवाला, कुल्फीवाला देखील आवाज देत त्यांच्या स्वादिष्ट गोष्टी आम्हाला खायला घालायचे. आठवणीने तोंडाला अजूनही पाणी सुटते. हल्ली ही जमात देखील नाहीशी झाली आहे. आणि हो, न्हावी देखील त्यांची पत्र्याची पेटी घेऊन आवाज देत फिरायचे आणि घरी येऊन केशकर्तन करायचे. हल्ली सलूनमधे जावे लागते. तिथे टीव्ही, सलूनचा एसी आणि न्हाव्याची कात्री यांचे संमिश्र आवाज ऐकू येत असतात. वर लावलेला टीव्ही हा पाहण्यासाठी नसतो कारण तुम्ही काही पाहू लागलात की कर्तनकाराने तुमची मुंडी फिरवलीच म्हणून समजा.

संध्याकाळी मुलांच्या खेळण्याचे आवाज कानी येतात, तर रात्री उशीरा पर्यंत सोसायटीतील काही रहिवासी मोठमोठ्याने गप्पा मारुन झोपमोड करतात.

दहीहंडी, गणेशोत्सव वगैरे उत्सवातील आवाजाबद्दल बोलायची तर सोयच नाही. नाहीतर तुम्ही मराठी माणसाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करताय म्हणून घरावर मोर्चा येईल.

आज महापलिकेकडून पाणी पुरवठा झाला नाही हे टॅंकरच्या आवाजाने समजते. रिक्षा, पेट्रोल वा डिझेलच्या गाड्या, बाईक अथवा स्कूटर न पाहता आवाजावरून ओळखता येतात. काहीच आवाज आला नाही तर इलेक्ट्रिक स्कूटर गेली हे ओळखावे !!!

माझ्या जुन्या सोसायटीत एक मित्र दुसऱ्या मजल्यावर रहात होता. तो ॲाफिसला जाताना नेहमी काहीतरी विसरायचा. मग आईला हाक मारुन ती वस्तु वरून खाली टाकायला सांगायचा. एकदा माझा दुसरा मित्र गंमतीने म्हणाला, एक दिवस हा आईला आवाज देऊन सांगणार, आई मला खाली टाक! आता बोला !!!

सकाळी जगात काय चाललंय ते बघायला मराठी वाहिन्यांवर बातम्या लावल्या की निवेदकांव्यतिरिक्त महाराष्ट्रातील विरोधी पक्ष नेत्यांचे आवाज हमखास कानावर पडतात. इतर कुठलेही सकारात्मक काम करण्याची क्षमता आणि इच्छाशक्ती नसल्यामुळे सरकार विरुद्ध बोलत राहणं एव्हढेच काम हे करतात. मग त्यांना उत्तर द्यायला सरकारी पक्ष आवाज उठवतात. हा विनोदी कार्यक्रम काही मिनिटे पाहून मी वाहिन्या बदलतो. हा कार्यक्रम अधिक विनोदी असतो की महाराष्ट्राची हास्यजत्रा हे ठरवणे कठीण आहे.

जाऊदे, आवाजावर (की अवाजवी ?) बराच उहापोह झालांय, बायको आवाज देऊन आत बोलावते आहे, म्हणून इथेच थांबतो. डोक्यावरचा पंखा देखील कुईकुई आवाज करतोय केव्हापासून !!!



Listen to audio File in this post




Comments

आवाजावर अवाजवी उहापोह! वाह वाह क्या बात है!

By : भालचंद्र
11/09/2026 8 : 08 : 06 PM

Seamless narration, from one topic to another while holding a common thread, niiiiice!

By : Sheela Bahadkar
11/09/2026 8 : 42 : 20 PM

छान. वाचायला मजा आली.

By : Sujata Chavan
11/09/2026 9 : 15 : 19 PM
Leave a comment
*Comment :
*Name :
Email :



Share This Article