नाते
पाणावले नयन सूर्य अस्तास जाता
कल्लोळ आठवांचा दाटला मनी आता
संपले जरी सारे शमला ज्वर आता
तमातून उठती धुंद स्वर लाटा
कानी येई काही कुणी वदले जरी नाही
आभास सावल्यांचा घोर अंधार हृदयी
हृदयात ऐकतो मी पदरव पैंजणांचे
का साद घालती स्वर आर्त आर्जवांचे
तुटले बंध सारे सरे काव्य चांदण्यांचे
नाही कुणी कुणाचे नाही कुणी कुणाचे
याच कवितेचे कवीने केलेले रसग्रहणः
जगात नाती अनेक आहेत, पण प्रियकर-प्रेयसीचे नाते काही वेगळेच आहे. या नात्याला अनेक कंगोरे आहेत. अनेक रंगछटांचे भावनिक विश्व यात सामावले आहे. आकर्षण, प्रेम, आनंद, उन्माद, शृंगार इत्यादी अनेक रस यात ओतप्रोत भरलेले आहेत. परंतु, प्रेमभंगानंतर यांत उफाळून येणारा कारुण्यरस सर्वच कवींना कायम खुणावत असतो आणि यातूनच “नाते” सारखी कविता जन्म घेते.
तो समुद्रकिनारी बसला आहे. नुकतीच त्याची प्रेयसी त्याला सोडून गेली आहे. पश्चिमेला सूर्य अस्तास निघाला आहे. सूर्योदय ही एक आनंददायी अनुभुती आहे. त्यात एक येणाऱ्या सुंदर काळाचे आश्वासन आहे, तर सूर्यास्ताला कारुण्याची झालर आहे.
पाणावले नयन सूर्य अस्तास जाता
कल्लोळ आठवांचा दाटला मनी आता
तिच्या जाण्याने मन उदास आहे. अजुनही तिच्याच आठवणींना मन भरुन गेले आहे.
संपले जरी सारे शमला ज्वर आता
तमातून उठती धुंद स्वर लाटा
नीरव शांततेत सागरी लाटा कर्णपटलांवर आघात करत आहेत. जणू क्षणोक्षणी वाढणाऱ्या तमातून अजुनही स्वरसाद ऐकू येत आहेत.
कानी येई काही कुणी वदले जरी नाही
आभास सावल्यांचा घोर अंधार हृदयी
कुणी काही बोलले नाही तरीही शब्दांचे भास होत आहेत. पण त्यामुळे हृदयातला अंधार अधिकच गडद होतो आहे.
हृदयात ऐकतो मी पदरव पैंजणांचे
का साद घालती स्वर आर्त आर्जवांचे
ती तर निघून गेली आहे, तरीही माझे मन का परत परत तिला साद घालते आहे? का? का??
तुटले बंध सारे सरे काव्य चांदण्यांचे
नाही कुणी कुणाचे नाही कुणी कुणाचे
रवि रजनीला भेटावयास निघाला आहे चांदण्याच्या रथावर आरुढ होऊन! पण मी असा, एकटाच, एकाकी उरलो आहे. आता सारे संपले आहे. शेवटी या निष्ठूर जगात कुणी कुणाचे नाही हेच खरे !



Comments
Beautiful, meaningful
By : Cyril David
सुंदर कविता, कारुण्याची झालर असलेली.
By : Pratibha Tarabadkar