नात्यांची गोष्ट : भाग ५: रवि
कॅालेजच्या पहिल्या दिवशी माझी आणि रव्याची ओळख झाली आणि मैत्री झाली ती कायमचीच! “हाय, माझं नाव रवि रानडे”, असं म्हणून तो माझ्या बेंचवर येऊन बसला. त्यानंतर सर्व लेक्चर्सना रवि कायम माझ्या बाजूलाच बसलेला असायचा. आम्ही एकदमच इंजिनियर्स झालो आणि लगेचच पार्टनरशिप मधे सॅाफ्टवेअर कंसल्टन्सी चालू केली ती आजतागायत चालू आहे.
रवि काय चीज आहे याचा प्रत्यय आम्हाला लगेचच आला. कॅालेज सुरु होऊन दोनच दिवस झाले होते आणि रविच्या मोकळ्या स्वभावामुळे आमचा पाचसहा मित्रमैत्रिणींचा ग्रुप बनला होता. कॅालेज जीवनाचा कॅंटीन हा सर्वात महत्वाचा आणि अविभाज्य घटक असतो. स्टुडंटस् क्लासमध्ये कमी आणि कॅंटीन मधे जास्त सापडतात आणि आम्हीही त्याला अपवाद नव्हतो. एक कटिंग चहावर तासभर टेबल कसं अडवून ठेवावे हा धडा इथेच शिकवला जातो. इराण्याच्या हॉटेलात बनमस्का, ऑम्लेट पाव, चहा झाल्यावर तिथून बराच वेळ हलायचं नाही. कंटाळून शेवटचा उपाय म्हणून वेटर बिल घेऊन येतो. ते आल्यावर परत चहा मागवायचा. मग त्याचं अजून एक बिल येतं. मग तेव्हढचं कॅशियरला देऊन सटकायचं, त्यामुळे बनमस्का, ऑम्लेट पाव फुकटात सुटतो, हे ज्ञान आम्ही काही दिवसातच मिळालं होतं. पण कॅालेज कॅंटीन चालविणारा अण्णा त्याच कॅालेजमध्ये शिकलेला असल्यामुळे ही ट्रीक कॅालेज कॅंटीनमध्ये चालत नसे. त्यामुळे एकाच कटिंग चहावर तासनतास काढण्याशिवाय उपाय नव्हता. कारण सर्वांचाच पॉकेटमनी लिमिटेड असायचा. अण्णा इंजिनियर असून देखील हॉटेल चालवत होता. कधीकधी आमच्या डिफीकल्टी देखील सोडवायला मदत करत असे.
नेहमीप्रमाणे एक टेबल अडवून आम्ही गप्पा मारत होतो, तेव्हढ्यात एक नवी मुलगी कॅंटीनमध्ये शिरली. तो पर्यंत रविच्या अनेक गुणांचे आकलन आम्हाला झाले होतेच. जर त्या मुलीला रविने पाच मिनिटांमध्ये आपल्या ग्रुपमध्ये आणले तर त्याचा एका दिवसाचा संपूर्ण खर्च आम्ही करायचा, नाहीतर रविने सर्वाना पार्टी द्यायची अशी पैज लागली. रवि उठून कॅश काऊंटर जवळ जाऊन त्या मुलीशी बोलू लागला. आम्ही ती मुलगी रविला चपलेने मारणार की कानाखाली आवाज काढणार याबद्धल आपापसात पैजा लावेपर्यंत रवि तिला घेऊन टेबलावर आला.
“गाईज, मीट मृणाल देसाई, आजच कॅालेजला जॉईन झाली आहे.” आम्ही सर्वजण खुर्चीवरून खाली पडता पडता राहिलो. सर्वांशी हाय, हॅलो होईपर्यंत क्लास मध्ये जायची वेळ झाली. बहुतेक आम्ही सर्व अतिशय सभ्य लोकं आहोत असा तिचा (गैर)समज रव्याने करून दिलेला असावा.
नंतर मी रविला बाजूला घेऊन विचारले, “रव्या, काय झमेला आहे यार?”
“झमेला? हट्, डायरेक्ट अॅक्शन! मी तिला म्हटलं, हे बघ, तू आजच आली आहेस, तुला कोणी मित्र-मैत्रिणी दिसत नाहीत. आमचा ऑलरेडी एक ग्रुप आहे. व्हाय डोंट यू जॅाईन?, आणि ती चालेल म्हणाली. हाय काय नी नाय काय.” रविची पर्सनॅलिटीच अशी आहे की कोणतीही मुलगी त्याला नाही म्हणणं शक्यच नाही.
आम्ही वर्गणी गोळा करून कसाबसा रविचा एक दिवसाचा खर्च भागवला. साहेबांनी पण पूर्ण ऐश करून घेतली. तेव्हापासून आजतागायत कोणीही रविशी कसलीही पैज लावलेली नाही.
त्यावेळेस टीवी, मोबाईल्स वगैरे नव्हते. थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पहाणं हा सर्वात आवडीचा टाईमपास! आणि लेक्चर बुडवून सिनेमा पहाण्याचं थ्रील वेगळंच होतं. अमिताभ बच्चनचा दीवार नुकताच रिलीज झाला होता. ब्लॅकमधे पण तिकिटे मिळत नव्हती. शेवटी हा प्रॉब्लेम सोडविण्याची जबाबदारी अर्थातच रव्यावर टाकण्यात आली. आम्ही सकाळी पाहिलं लेक्चर बुडवून दहाचा शो बघण्याचं ठरवलं. सकाळची तिकिटे मिळण्याची शक्यता जरा जास्त होती. पण कुठलं काय! शो हाउसफुल होता. रवि थेट मॅनेजरच्या केबिन मधे गेला आणि पाच मिनिटांत तिकिटे घेउन आला. आम्ही धावतच आत शिरलो.
नंतर आम्ही रव्याला विचारले, “कसं काय मॅनेज केलंस रे?”
“एकदम सोपं आहे. मी मॅनेजरला सांगितलं, आम्ही आर्टचे विद्यार्थी आहोत. सरांनी आम्हाला या सिनेमाचा रिव्हू लिहायची असाईनमेंट दिली आहे आणि उद्या शेवटचा दिवस आहे. तर आम्हाला प्लीज तिकिटे द्या.”
“काय फेकतोस? तू सांगितलंस आणि त्याला पटलं?”
“काण्याचं लेटर दिलं ना त्याला!” काण्या म्हणजे आमचे पूज्य गुरुजी. शिक्षकांना टकल्या, काण्या अशी टोपण नावं ठेवण्याची परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे.
“तुला कधी दिलं काण्याने लेटर?”
“डोक्यावर पडलाय का रे तुम्ही? मीच लिहून सही केली काण्याची. मॅनेजरला कुठे माहित आहे त्याची सही? पंढरीकडून लेटरहेड पैदा केलं. हाय काय नी नाय काय?”
“पण पंढरीने तुला दिलं बरं?”
“त्याला दिलं ना एक तिकीट. आपल्या मागेतर बसला होता.”
कालपरत्वे रवि मृणालच्या प्रेमात पडणं म्हणजे मुलांना मिशा येण्याएवढं नैसर्गिक होतं. पण साहेबांची प्रेमकथा जरा वेगळीच आहे. जसा रवि तिच्या प्रेमात होता तशी ती पण रविच्या प्रेमात आहे हे आम्हा सर्वाना कळत होतं. पण रवि? घोडं इथेच तर पेंड खात होतं. इतर सर्व गोष्टीत बिनधास्त असणारा रवि मृणालशी या बाबतीत तोंड उघडायला घाबरत होता.
शेवटी एक दिवस मीच मृणालला बाजूला घेऊन म्हटलं, “हे बघ बये, हा रव्या तुझ्या प्रेमात पडलाय पण तुला विचारायला घाबरतोय.”
“हो रे, माहितीये मला! मला देखील रवि आवडतो. मी केव्हाची वाट पहातेय की स्वारी आज बोलेल, उद्या प्रपोज करेल, पण हा गधडा तोंड उघडेल तर शप्पथ!”
रवि म्हणजे एक अजब रसायन आहे. सहा फूट उंच, गोरागोमटा, दिसायला अतिशय हँडसम, मुली ह्याच्या प्रेमात पडल्या नसत्या तरच नवल! पण त्याहीपेक्षा रवि तेव्हढाच हुशार आणि समंजस आहे. कोणालाही मदत करायला सदैव तयार. स्वारी दर सहा महिन्यांनी न चुकता ब्लड डोनेट करायची. संगीताची प्रचंड आवड. त्याचा स्वतःचा आवाज देखील छान आहे. नाटकात काम करण्याची दांडगी हौस. अतिशय सुंदर पेन्टींग्ज रेखाटतो. आणि सर्वात कळस म्हणजे हे सर्व उद्योग करून कम्पुटर इंजिनीरिंगमध्ये गोल्डमेडलिस्ट आहे. आणि तरीही आपल्या प्रेमाचा इजहार करायला स्वारी घाबरत होती. इथे मुलं कसलाही आगापिछा नसताना मुली पटवतात. आणि त्यांना देखील त्या पटतात कशा, काय माहित?
मृणालचा स्वभाव याच्या अगदी विरुद्ध आहे. अतिशय प्रॅक्टिकल मुलगी आहे. दिसायला छान तर आहेच पण वागायला, बोलायला आणि एक मैत्रिण म्हणून, शी इज अ जेम! तिची आणि रविची जोडी म्हणजे अगदी मेड फॉर इच अदर अशीच आहे.
शेवटी आम्हीच स्टेपस् घेतल्या नाहीत तर परिस्थिती हाताबाहेर जाईल असं लक्षात आल्यावर मृणालच्या संमतीने एक प्लॅन बनवण्यात आला. दर शनिवारी आमची लॅब असायची. त्या दिवशी आम्ही सर्व गुपचूप बाहेर सटकलो आणि दरवाज्याला बाहेरून कडी घातली. फक्त मृणाल आणि रवि आत राहिले होते. आता तरी नक्की काम फत्ते होईल याची आम्हाला खात्री होती.
दुसऱ्या दिवशी उत्साहाने आम्ही कॉलेजला पोहोचलो. समोरच मृणाल चेहरा पाडून पायऱ्यांवर बसली होती.
“काय ग, काय झालं?”मी.
“कसलं काय! तुमचा मित्र जरा जास्तीच हुशार आहे.” मृणाल.
“पण काय झालं?”
“बराच वेळ आरडाओरडा करून दरवाजा उघडायला कोणी आलं नाही. शेवटी साहेबांनी एका वायरचा हूक बनवून खिडकीतून हात घालून कडी काढली.”
“मग?”
“मग काय, खूप उशिर झाला होता. मी टॅक्सी करून घरी गेले.”
“आणि तरीही पठ्ठया काहीही बोलला नाही?”
“बोलला ना. घरी सोडायला आला. टॅक्सीचे पैसे पण दिले. पण बाकी चकार शब्दही नाही.”
मी कपाळावर हात मारला. घोड्याला पाण्यापर्यंत नेता येईल पण पाणी पाजायचे कसे?
पण शेवटी एके दिवशी गंगेत घोडं न्हालं. सकाळी कॅालेजमध्ये आलो तर मृणाल आणि रवि हातात हात घालून पायऱ्यांवर बसलेले! आमचे चेहरे म्हणजे अजी म्यां ब्रह्म पहिले असे झाले.
“हे अघटीत कसे घडले?” मी रव्याला म्हटलं.
“मृणालच सांगेल तुम्हाला!”
“मी विचार केला”, मृणाल म्हणाली, “हे ध्यान काही करणार नाही, तेव्हा मलाच काहीतरी केले पाहिजे. काल शेवटचे लेक्चर बुडवून मी सरळ रव्याच्या घरी गेले. त्याची आई मला ओळखतेच. मी सरळ त्यांना सांगितलं की आम्ही दोघं एकेमेकांच्या प्रेमात आहोत पण तुमचा मुलगा मला प्रपोजच करत नाहीये. आता मी काय करू सांगा? आई म्हणाल्या, बापाच्याच वळणावर गेलाय. मलापण यांनी वात आणला होता. अगदी सेम स्टोरी!”
“मग?”
“मग काय, असा झाडलाय आईंनी रव्याला! हसून हसून माझं पोट दुखायला लागलं! कॅालेजच्या पहिल्या दिवशी रव्याने डायरेक्ट मेथड वापरली. मी त्याची परतफेड केली! पण खरे आभार तर अशोकचे मानायला हवेत. त्याने सांगितल्यामुळे मला डायरेक्ट मेथड वापरायला बळ मिळालं. नाहीतर हे महाराज बोलायलाच तयार नव्हते.”
“मी योग्य वेळी विचारणारच होतो मृणालला.” रव्याला शेवटी कंठ फुटला.
“झालं, तुझी योग्य वेळ येईपर्यंत मृणालचं लग्न होऊन दोनचार मुलं पण झाली असती.”
आज रवि आणि मृणालला आमच्यासारखीच दोन मुलं आहेत. मी, आदिती, रवि आणि मृणाल, आमची घनिष्ट मैत्री आहे. विशेषतः आदितीची मृणाल खूप जवळची मैत्रिण झाली आहे. आणि आदिती म्हणते ते अक्षरशः खरं आहे. मी तर पहिल्यापासूनच रव्याच्या प्रेमात आहेच!



Comments
एकदम भारी.मलापण कॉलेजचे रम्य दिवस आठवले.ओघवते लिखाण.
By : Pratibha Tarabadkar
सुंदर दीर्घ कथा. प्रसंगोचित संवाद आणि प्रत्येक व्यक्तीचे विशेष आणि स्वभाव यांचे अप्रतिम वर्णन. कथा मनाचा ताबा घेते, संपेपर्यंत सोडवत नाही!
By : Bhalchandra Shrikhande
छान कथा आहे.....असा एक मित्र असला पाहिजे...
By : समीर पेशवे
छान कथा मस्त पुढे चालली आहे.
By : SHEETAL SURESH KHIRE