नात्यांची गोष्ट : भाग २ : दिवाळी पहाट


किचनचे दिवे बंद करून आदिती बेडरूम मध्ये आली आणि मी माझा लॅपटॉप बंद केला. पन्नाशी उलटून गेली तरी ती ज्या रूम मध्ये येईल तिथल्या सर्व पुरुषांचे आणि बायकांचे देखील लक्ष वेधून घेण्याचं सामर्थ्य अजूनही तिच्या चेहऱ्यात आहे. पूर्ण पाच फूट उंची असली तरी आत्तापर्यंत मेंटेन केलेली फिगर आणि काळ्याभोर केसात डोकावू लागलेले सिल्वर स्ट्रीकस् यामुळे अजूनही सर्वाच्या नजरा आपसुकच तिच्याकडे वळतात. आणि मी याला अपवाद कसा असेन?

केसांचा बन सोडून खांद्यावर पसरलेले केस आरश्यासमोर विंचरता विंचरता अदिती म्हणाली,
“आशु, दिवाळी चार दिवसांवर आली आहे.”
“मग?”
“अरे, विन्याच्या लग्नाचं हे पहिले वर्ष आहे. दिवाळसण नको का करायला?”
“लग्न? ते तर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहेत. लग्न कुठे झालयं अजून?”
“ते काहीही असो, आपल्या दृष्टीने ते लग्नच आहे.”
“आणि एक वर्षाने तुटलं म्हणजे? सगळा खर्च फुकट!”
“अशोक!!!”
“अग गम्मत केली. काय विचार आहे राणी सरकारांचा?”
असं म्हटल्यावर बाईसाहेबांचा चेहरा खुलला. “ मी छान सेलिब्रेट करायचा प्लॅन बनवला आहे.”, हातातला कंगवा बाजूला ठेऊन बेडवर बसत अदिती म्हणाली.
मी मनातल्या मनात एक मोठा निश्वास सोडला. अदितीचे साधे प्लॅन देखील भन्नाट असतात. इथे तर आक्खा दिवाळसण होता.

“हे बघ, त्या दिवशी सकाळी सहा वाजता बाजूच्याच नगरपालिका सभागृहात दिवाळी पहाटचा कार्यक्रम आहे. मराठी गाणी, नृत्य, फ्युजन मुझिक, कॉमेडी अशा सर्व गोष्टी आहेत. आणि मुख्य म्हणजे सर्व उदयोन्मुख कलाकार आहेत.” संध्याकाळी बहुधा हिने कालिंदीची शाळा घेतली असावी. नाहीतर उदयोन्मुख कलाकार वगैरे जड मराठी शब्द वापरणे अदितीच्या स्वभावात बसत नाही. आमच्या घरात एकेक नमुने भरलेले आहेत. कालिंदी, आमचं कन्यारत्न, फक्त शुद्ध मराठी बोलतं, जे आम्हाला समजायला जरा अवघड जातं.
“बापरे, सकाळी सहा वाजता?”

मला आमची लहानपणची दिवाळी आठवली. त्यावेळी दिवाळी पहाट सारखे कार्यक्रम नव्हते. पहाटे पाचला उठून सुगंधी उटण्याने अंघोळ करून नवीन कपडे घालून फटाके उडवणे हा आमचा एककलमी कार्यक्रम असायचा. ज्यांच्या घरात दिवे लागलेले नसतील त्यांच्या घरासमोर किंवा आमच्या सारख्या लहान मुलांशी खडूसपणे वागणाऱ्या लोकांच्या घरासमोर मुद्दाम बॉम्ब फोडणे हे आमचे प्रमुख आकर्षण असायाचे. हल्ली पर्यावरणाच्या काळजीपोटी फटाके कमी झाले आहेत. एका अर्थी बरंच आहे म्हणा! नउ साडेनऊच्या सुमारास दिवाळी फराळ व्हायचा. लाडू, चकली, चिवडा, शंकरपाळे, अनारसे यांची रेलचेल असायची. सोसायटीतील सर्व गृहिणी आठ दिवस खपून सर्व पदार्थ घरी बनवायच्या. हल्ली हे सर्व श्रध्दा, स्वाद सारख्या दुकानामधून रेडीमेड येते.

“अरे, एखाद दिवस लवकर उठलास तर काही बिघडत नाही. मॅचेस बघायला गजर लावून उठतोस तेव्हा रे? तर दिवाळी पहाट दहा पर्यंत संपला की घरी येऊन ब्रेकफास्ट करू. मी सगळं ऑर्डर करीन. नंतर जेवायला बाहेर जाऊ. मी निशुसाठी डायमंडचा सेट बनवून घेतला आहे. शरद स्वाती (आमचे व्याही, अर्थातच लिव्ह इन) साठी गिफ्टस् आणल्या आहेतच. विन्याला नवीन लॅपटॉप तू घेऊन दे.”
नेहमीप्रमाणे बाईसाहेबांचे प्लॅनिंग तयार होतंच. मी मम म्हटलं एवढंच!
“कालिंदीचा एक मित्र पण आपल्याबरोबर असेल.” आदितीने दिवाळीआधीच बॉम्ब फोडला. म्हणजे संध्याकाळच्या शाळेचा स्पेशल क्लास यासाठी होता तर!
“आता हा कोण?”
“अरे जय! तू भेटला आहेस त्याला. तिच्याबरोबर कॉलेजात आहे. सीएची पूर्वपरीक्षापण पास झाला आहे.”
“मग?”
“अरे मग वगैरे काही नाही, चांगला मित्र आहे एवढंच!”

आम्ही शिकत असताना दिवाळीला एखाद्या मैत्रिणीला घरी बोलावलं असतं तर कानाखाली फटाके नक्की फुटले असते. पण आता बोलायची सोय नाही. आमची एकच अशी पिढी असेल जी आईबाबांना पण घाबरायची, शिक्षकांना पण घाबरायची आणि आता मुलांना पण घाबरते. घाबरट लेकाचे! आमच्या घरात फक्त आदितीचीच वट चालते.

ठरल्याप्रमाणे दिवाळीच्या पहिल्या दिवशी (आमच्या वेळी त्याला नरकचतुर्दशी म्हणायचे) सुचिर्भूत होऊन, आदितीने आणलेल्या नवीन कपड्यांवर डीओडरंट उडवून आमचे नगरपालिका सभागृहासमोर आगमन झाले. शरद स्वाती बरोबर सुप्रभातची देवाणघेवाण झाली. थोड्याच वेळात नव लिव्ह-इनीट दांपत्य विन्या आणि निशू हजर झाले. नंतर एका बाईकवरून डोक्यावर केसांचे टोपले, आउटसाईझड् टी शर्ट आणि स्ट्रेसड् (म्हणजे गुडघ्यावर फाटलेली) जीन्स अशा अवतारात एक सहाफुटी किरकोळ बांध्याचा मुलगा आला. उतरल्या उतरल्या बिनदिक्कत कालिंदीला मिठी मारून त्याने तिच्या गालावर पेक् केले आणि मग इतर सर्वांना हाय केले. संस्कारी वाटला एकदम!

“हॅलो, मी जे मॅलहोट्रा!”

ह्याला दिवाळी पहाटचा मराठी कार्यक्रम कसा काय समजेल हे मला समजेना.

आदितीच्या हाय सोसायटी कनेक्शन्समुळे आम्हाला पहिल्या रांगेची तिकिटे मिळाली होती. आत शिरेपर्यंत सीटवर बसून घेण्याची घोषणा झाली आणि आम्ही बसेपर्यंत राष्ट्रगीतासाठी उभं राहण्याची विनंती झाली. या उठाबशांनंतर आम्ही पडदा वर जाण्याची वाट पाहू लागलो. गणपती वंदने नंतर एका तरुण जोडप्याने स्टेजचा कब्जा घेतला आणि रॅपिड फायर राउंड प्रमाणे सर्व प्रायोजकांची नावे वाचून दाखविली. त्यानंतर एक कॉमेडी शो झाला. त्यात सर्व पुरुषांनी बायकांचे व बायकांनी पुरुषांचे वेश परिधान केले होते. खूपच फनी होता! नंतर नाच व गाण्याचे फ्युजन झाले. म्हणजे सिंथेसाईझर वर मराठी लावणी आणि ढोलकीवर मराठी रॉकमुझिक वाजवले गेले. त्यानंतर उदयोन्मुख गायकांची गायकी पेश केली गेली. ती ऐकून या गायकांचा उदय होण्यास बराच काळ जावा लागेल हे सिद्ध झाले. ह्या सर्व प्रकारात जे मॅलहोट्रा मधूनमधून मान हलवत होता. ती गाण्याच्या तालावर हलत होती की डुलक्या घेत होती ते शेवटपर्यंत मला समजले नाही.

तीन तासांच्या मानसिक छळानंतर वंदे मातरम साठी शेवटची उठाबशी काढून दिवाळी पहाटेची एकदाची सकाळ झाली.

यथासांग घरी येऊन छानपैकी पेटपूजा झाली. सर्व फराळ मात्र फक्कड होता. कुठे काय चांगलं मिळतं हे आदितीला पक्क ठाऊक आहे. त्यानंतर भेटवस्तूंची देवाणघेवाण झाली. हळूच मी जे मॅलहोट्राला बाजूला घेतले. होस्ट म्हणून माझं पण काही कर्तव्य आहेच ना!
“जे, तू काय करतोस? घरी कोणकोण आहे?”
“ओह मी स्टडी करतोय. सीए होणार. माझे वडील फिल्दी रिच आहेत. त्यांचा बिझिनेस पुढे चालवेन.” एका वाक्यात आक्खा सीव्ही सांगितला त्याने.
“छान छान! कीप इट अप!” यापुढे मी काय बोलणार होतो.
असा हा दिवाळसण लंच नंतर संपन्न झाला. लगेचच मी कालिंदीला कॉर्नर केले.
“माझे आई, हे ध्यान तुला कुठे भेटले?”
“बाबा ध्यान काय, चांगला मित्र आहे माझा. वागायला जरा विक्षिप्त आहे एवढंच.”
“जरा?”
“खूप हुशार आहे. अभ्यासात खूप मदत होते मला त्याची.”
कालिंदी खूप हुशार आहे आणि वयाच्या मानाने मॅच्युरिटी पण चांगली आहे. आणि मुख्य म्हणजे आमचा खूप विश्वास आहे तिच्यावर. त्यामुळे या विषयाला आत्ता तरी स्वल्पविराम द्यायला माझी काहीच हरकत नव्हती.

रात्री आदितीला सहज म्हटलं, ”ही आजची एक दिवाळी पहाट होती आणि आपण लहानपणी अनुभवलेली दिवाळी पहाट आहे. मी कधीही जुनीच दिवाळी पसंत करेन.”
आदितीपण माझ्यासारखीच मध्यम वर्गातून वर आलेली आहे. आमचे लहानपणचे अनुभव एकसारखेच आहेत.
“असं बघ, तो एक काळ होता. टाइम्स चेंज. आपण प्रगती केली आहे. आज स्टॅबिलीटी आहे. दोन सोन्यासारखी मुलं आहेत. अजून काय हवं आयुष्यात?”

तिचं म्हणणं बरोबर होत. पण तरीही मनात कुठेतरी... काहीतरी बोचत होतं नक्की.

Comments

एकदम मस्त.चिमटे,टपल्या, गुदगुल्या यांनी भरगच्च अशी दिवाळी पहाट!

By : Pratibha Tarabadkar
07/05/2023 2 : 01 : 07 PM

खुसखुशीत, खमंग दिवाळी पहाट. दोन पिढ्यातील विचारधारणा दाखवणारी.

By : हेमांगी
08/05/2023 09 : 44 : 10 AM

Excellent 👌

By : Cyril David
08/05/2023 4 : 16 : 33 PM

Good. You explained new generation properly. Very nice.

By : Kanhaiya Kulkarni.
09/05/2023 1 : 47 : 49 PM

वाह ...छान कथा आहे...

By : समीर पेशवे
10/05/2023 4 : 03 : 24 PM
Leave a comment
*Comment :
*Name :
Email :



Share This Article