सप्तपदी


पाउल पहिले


मी अपर्णा सहस्रबुद्धे. सध्या मुंबईतल्या एका रेस्टॉरंटमध्ये प्रशांत नावाच्या प्राण्याची वाट पहात बसले आहे. हा प्रशांत म्हणजे सप्तपदीमधलं सातवं पद आहे. दिलेली वेळ टळून पंधरा मिनिटे होऊन गेली आहेत. आणि मुंबईसारख्या शहरात, जेथे सेकंदांचा हिशोब ठेवावा लागतो, हे जरा जास्तच होतंय. पुण्यात अर्धाएक तास हा उशिर म्हणून गणला जात नाही. खरं तर आज शानिवार म्हणजे सुट्टीचा दिवस. माझ्या सारख्या आयटी मध्ये काम करणाऱ्या मुलीला याचे अतिशय महत्व असते. आणि तरीही मी माझी सकाळ वाया घालवते आहे. आणि हीच नाही, असे सहा शनिवार मी घालवले आहेत. आणि हे सर्व चालू आहे ते मिस्टर आणि मिसेस सहस्रबुद्धे यांच्यामुळे. आता तुम्ही विचारलं की हे मिस्टर आणि मिसेस सहस्रबुद्धे म्हणजे कोण? आणि हे तुमचं विचारणे पण सहाजिक आहे. तर हे मिस्टर आणि मिसेस सहस्रबुद्धे म्हणजे माझे आईवडिल! आता तुम्ही विचाराल की ही काय भानगड आहे आणि ते देखील विचारणे सहाजिकच आहे. त्याचे झाले असे की...., पण थांबा, हा प्रशांत उगवलेला दिसतोय. एक स्वारी आत्ताच रेस्टॉरंटमधे प्रवेश करती झाली आहे. आणि ज्या पद्धतीने तो इकडेतिकडे पहात कोणाला तरी शोधतो आहे त्या अर्थी तो माझाच प्रशांत असावा. म्हणजे अजून माझा झालेला नाही पण त्याला एक संधी आहे माझा होण्याची!

पण प्रशांतची मुलाखत सुरु करण्याआधी एक सहासात आठवडे मागे जाउया म्हणजे तुम्हाला सर्व काही नीट ध्यानात येईल.

त्याचे झाले असे की मी मुळची पुण्याची. आईवडील पुण्यात असतात. आय टी मध्ये शिक्षण झाल्यावर जॉबकरता मुंबईत आले. मी पाच वर्ष पवईमध्ये जॉब करते आहे आणि सध्या एका बंगाली मुलीबरोबर एक दोन बेडरूम अपार्टमेंट शेअर करते. शोमा माझ्याच कंपनीमध्ये कामाला आहे. माझ्या आणि तिच्या आवडीनिवडी जुळल्या आणि भाषेचा प्रॉब्लेम पण नव्हता त्यामुळे सर्व कसे छान चालले होते. पण माझ्या आईवडिलांना कुणीतरी सुचवले की अपर्णा पंचवीस वर्षाची झाली आहे तेव्हा तिचे लग्न आता झालेच पाहिजे. झाले, ते दोघे हात धुवून माझ्या मागे लागले. मी बराच टाळण्याचा प्रयत्न केला, पण दोघेही ऐकेच नात. शेवटी मी सांगितले की ठीक आहे, पण मला पारंपारिक पद्धतीने कांदेपोहे वगैरे जमणार नाही. मी आधी मुलाला एकट्यानेच भेटेन आणि जर पसंत पडला तर पुढे जाऊ. मला फक्त शनिवारीच वेळ मिळेल आणि ते देखील मुंबई किंवा पुण्यातच!

मग काय, मातोश्री कामाला लागल्या आणि शंभर मुलांची यादीच बनवली. मी म्हटलं, आई, एव्हढी मुले बघितली तर लग्न कधी होईल माझे? शेवटी काटछाट करून सात नावे निवडण्यात आली. त्यातले तीन पुण्यातले तर चार मुंबईचे होते.

सुरुवात पुण्यापासून करण्याचे ठरले. पहिल्या मुलाचे नाव जय होते. फोनवरून शनिवारी सकाळी दहा वाजता कॉफी हाउस मध्ये भेटायचे ठरले. आईवडिलांनी आम्ही पण येतो असा आग्रह धरला. पहिलाच मुलगा आहे, मुंबईत तर तू एकटीच असशील वगैरे आर्ग्युमेंटस् मुश्किलीने थोपवून मी एकटीच कॉफीहाउसला पोचले. आदल्या दिवशी काम संपवून मुंबईहून निघेपर्यंत संध्याकाळचे सात वाजून गेले होते. त्यात एक्स्प्रेसवेचा ट्रॅफिक, यामुळे झोपायला बारा वाजून गेले होते. आणि शनिवारी सकाळी एव्हढ्या लवकर उठून “छान” वगैरे दिसत दहा वाजता अनोळखी माणसाला भेटणं हे सर्व जरा अजबंच वाटत होते. तशी मी दिसायला अगदी सुंदर नसले तरी ठीकठाकच आहे. खूप उंच नसले तरी बुटकी नक्कीच नाही. आणि ड्रेसिंग सेन्स पण बऱ्यापैकी आहे मला. आणि बोलणं पण एकदम तोडफोड तांबा पितळ! तशीही कॉलेजमध्ये तीनचार मुलंतरी मागे लागली होतीच ना!

पुणेरी वेळेनुसार साडेदहा वाजता जय हजर झाला. आम्ही एकमेकांचे फोटो पहिले होतेच, त्यामुळे ओळखायला सोपं गेलं. त्याने लांबूनच मला हात केला आणि “हाय, मी जय” असे म्हणत समोर येऊन बसला. मी पण त्याचा “हाय” परत करून “मी अपर्णा” अशी ओळख करून दिली. तसा दिसायला स्मार्ट वाटला.

“मला खूप भूक लागली आहे, आपण ब्रेकफास्ट मागवू या का आधी?” असे म्हणून त्याच्या होकाराची वाट न पहाता मी वेटरला हात केला. एकतर सकाळपासून काही खाल्ले नव्हते त्यामुळे कसंसच व्हायला लागले होत मला! वेटर आल्यावर,” मला एक रवा मसाला डोसा,” असे मी त्याला परस्पर सागून मोकळी झाले.

“तू काय घेणार?” मी जयला विचारले.
“मला एक ग्लास ताक आण.” जय वेटरला म्हणाला. “काय आहे, मी दिक्षित डायट करतो. त्यामुळे दिवसातून दोनदाच खातो. इतर वेळी फक्त ताक पितो. नो चहा, कॉफी इत्यादी इत्यादी.”
जयने अधिक टिप्पणी केली. मी (मनातल्या मनात) कपाळाला हात लावला. कारण खाणे हा माझा वीक पॅाईंट आहे आणि ही स्वारी दिक्षित डायट करत होती. म्हणजे एकून जरा कठीणच दिसत होते मला!
“पण म्हणजे कशासाठी? तुला काही प्रॉब्लेम आहे का?” मी म्हणाले.
“प्रॉब्लेम? छे छे, पण आत्तापासूनच फिटनेस सांभाळला पाहिजे ना!” हे मात्र बरोबर होतं. मी पण रोज सकाळी पंचेचाळीस मिनिटे जॉगिंग करतेच. पण म्हणून एव्हंढ डायट! आयुष्यात खाणंपिणं पण हवंच! नाहीतर जगायचे कशाला?
नंतरची दोन मिनिटे पॉजमध्ये गेली. ही स्वारी आपल्याच मोबाईल मध्ये मग्न होती. मसाला डोसा आल्यावर मी त्यावर तुटून पडले. नंतर एक इडली सांभार खाल्यावर माझ्या जीवात जीव आला. तो पर्यंत जय एखादं ड्रिंक घ्यावे तसं ताक पीत होता. मी कॉफी मागवली आणि जयला म्हटलं,
“बाकी काय?”
तेव्हा कुठे स्वारी भानावर आली. मोबाईल मधून डोक वर काढून मला म्हणाला,
”अग नाही, एका मित्राला टेक्स्ट करत होतो. तू पण खात होतीस ना!”
“मग आता बोल.” मी म्हणाले.
“हे बघ, आमची इलेक्ट्रोनिक्स अप्प्लायन्सेसची शोरूम आहे. मला मधूनमधून लक्ष ठेवावे लागते एव्हढेच! इतर वेळी मी जिममध्ये जातो, ट्रेकिंग करतो आणि मित्रांबरोबर टाईमपास करतो. प्रभात रोडला आमचा बंगला आहे. लग्न झाल्यावर तुला जॉब करण्याची गरज नाही. मस्त मजेत राहू आपण!” साहेबांनी मनातल्या मनात लग्न करून आमचे आयुष्यपण सेट करून टाकले होते.

“ते ठीक आहे, पण मी जॉब मला करियर करायची आहे म्हणून करते आहे. मला माझे स्वतंत्र अस्तित्व हवे आहे. फार तर मी पुण्याला शिफ्ट होऊ शकते पण माझे करियर तर चालूच राहील. आणि फिजिकल फिटनेस कडे मी पण लक्ष देते, पण ट्रेकिंग वगैरे मला जमत नाही.”
यानंतर बोलण्यासारखे फारसे काही शिल्लक नव्हते. मी वेटरला माझे आणि त्याच्या ताकाचे बिल दिले आणि एकमेकांचा निरोप घेतला.

ही सर्व कथा ऐकून मिस्टर आणि मिसेस सहस्रबुद्धे थोडे निराश झाले नसते तरच नवल होतं. पण मी आईला म्हटलं, “ अग, त्यात काय एव्हढं, पहिलाच मुलगा पाहिला आहे. आहेत अजून बरेच. जगात सध्या ४३ मुलींसाठी ५० मुले असे प्रमाण आहे. त्यामुळे सात फ्री बर्डस असतीलच ना!” हे ऐकल्यावर मातोश्री अजूनच उचकल्या.

“हे बघ, सगळं हसण्यावारी नेऊ नकोस. नाहीतर मी ठरवेन त्या मुलाशी लग्न करावे लागेल तुला, सांगून ठेवते आधीच!”
“अग हो हो, जरा दमाने घे! अजून सहा बाकी आहेत.” मी तात्पुरता का होईना, विषय संपवला.

दुसरे पद


पुढील शनिवारी संध्याकाळी सात वाजता मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये अजयला भेटण्याची वेळ ठरली होती. अजय मुंबईचाच असल्यामुळे पाच मिनिटे आधीच बाहेर माझी वाट बघत उभा होता.

“हाय, मी अजय!”, असे म्हणून माझ्याशी हस्तांदोलन करत अजय उद्गारला. त्याने टेबल देखील आधीच बुक केले होते. मुंबईच्या मुलांच हे एक बरं असतं. त्यांचे स्वत:चे आयुष्य नीट आखलेले असते. अर्थात त्याशिवाय तुम्ही मुंबईत टिकू शकत नाही हे देखील तेव्हढेच खरे.
आतमध्ये मंद प्रकाश पसरला होता, मागे मधुर संगीत ऐकू येत होत. एकमेकांचे चेहरे दिसतील एव्हढाच उजेड टेबलावरील कँडलमधून झिरपत होता. मला न विचारताच अजयने बियरचे दोन पाइंट मागवले.
“ मी अर्थातच तुझी प्रोफाईल वेबवर बघितली आहे, त्यामुळेच तुला न विचारता बियर मागवली.” अजय म्हणाला. माझ्या दृष्टीने सुरवात तर चांगली झाली होती. पावणेसहा फुट उंच अजय नक्कीच हँडसम होता. जीन आणि टी शर्ट असा वेषदेखील त्याला शोभून दिसत होता.
“नाईस ड्रेस!” अजयने माझ्या लॉंग स्कर्टला काँम्प्लिमेंट दिले.
“थँक यू!” मी म्हटले.
अजयने वेटरला हात केला. त्याने आणलेला पुष्पगुछ्च मला देत अजय म्हणाला, ”हे तुझ्यासाठी!”
एव्हढे छान स्वागत झाल्यामुळे मी थोडीशी गोंधळले होते. पण परत अजयनेच सुरुवात केली.
“मला खरतर शनिवारी पण सुट्टी नसते, पण आज जरा लवकर निघालो.” अजय एमबीए झाला होता व एका कंपनीमध्ये एचआर हेड म्हणून काम करत होता. वेल पेईंग आणि स्टेडी जॉब होता व वेळेचे पण प्रेशर कमी होते. मुंबईत दोन बीएचकेचा फ्लॅट होता. आईवडील पुण्याला रहात होते. बाकी काही जबाबदाऱ्या पण नव्हत्या. म्हणजे मिसेस सह्स्रबुद्धेना आवडेल असेच स्थळ होते एकंदरीत!
“मग आता पुढे काय विचार आहे?” मी विचारणा केली.
“काही नाही आपल आयुष्य एकदम सेट आहे. मस्त एन्जॅाय करत जगायचं.”
“जॉब बदलायचा वगैरे काही विचार आहे का?”
“कशासाठी? आपलं सध्या मस्त चाललाय.”
“पण म्हणजे अधिक चांगला जॉब मिळाला तर?”
“एचआर मध्ये सगळे जॉब्ज सारखेच असतात. सॅलरी पण फारशी बदलत नाही. मग कशाला बदलायचा जॉब? वर्षाला सहा सात टक्के वाढतात तेव्हढे खूप झाले. शिवाय वडिलांनी भरपूर कमवले आहे. इन्कमटॅक्समध्ये होते ना!” अजय सूचकपणे म्हणाला.
आपण लवकरच ठरवूया असे एकमेकाना सांगून डिनर घेऊन आम्ही निरोप घेतला. परंतु माझ्या मनात मात्र मिसेस सहस्रबुद्धेंच्या यादीतील दुसऱ्या नावावर पण फुली मारली गेली होती.

(शोमाचं) वाकडं पाउल


आता तुम्ही म्हणाल माझ्या कथेशी शोमाचा काय संबंध आहे? आहे, म्हणूनच सांगतेय. त्याचं झाल असं, की शनिवारी माझी आणि विजयची भेट ठरली होती मुंबईतच. विजय म्हणजे सप्त्पदीमधले तिसरे पद! पण यात चौथे पद आणि शोमाचे वाकडे पडलेले पद यांचा गुंता झाला आणि तो सोडवायला अख्खा विकेंड खर्ची पडला.

शुक्रवारी मातोश्रींचा अर्जंट फोन आला. पुढच्या शनिवारी पुण्यात संजयला भेटायचे ठरले होते पण काही कामानिमित्त तो या रविवारी रात्रीच देशाबाहेर जाणार होता आणि नंतर महिनाभरानेच परत येणार होता. त्यामुळे मला विजय आणि संजय या दोन्ही मोहिमा याच शनिवार-रविवारी पार पाडाव्या लागणार होत्या. त्यामुळे मी विजयची मुलाखत शनिवारी सकाळी माझ्याच घरी पवईला रि-शेड्यूल केली व तसे शोमाला कळवले. शोमा तब्बेत बरी नाही म्हणून घरीच होती. पण रात्री घरी पोचल्यावर सर्व सीनच बदलला.

मी घरी पोचले तरी शोमा बेड मधेच होती. काय झाले विचारल्यावर पठ्ठी बोलायलाच तयार नव्हती. शेवटी दादापुता करून सर्व कहाणी समजल्यावर मात्र मी कपाळाला हात लावला. शोमाचा एक अनिर्बन नावाचा बॉयफ्रेंड आहे. आणि मी दर विकेंडला पुण्याला जात असल्याचा पुरेपूर फायदा या दोघांनी घेतला होता. आजच्या काळात सर्व साधने उपलब्ध असताना देखील ही बया प्रेग्नंट राहिली होती.

“मग आता?” मी विचारले.
“अनिर्बन म्हणतो आपण लग्न करुया.” शोमा म्हणाली.
“मग प्रश्नच मिटला.”
“पण घरी सांगायला लागेल ना!”
“मग सांग ना!”
“आई बाबा हाकलून देतील घरातून!”
“तशीपण तू इथेच रहातेस ना! आणि अनिर्बनचे स्वत:चे घर आहेच.”
“हो ग, पण मला भीती वाटते.”
“मग घाबर!” मी वैतागून म्हणाले. “ नसते उद्योग करताना नाही वाटली भीती? तेव्हा मजा वाटली असेल ना?”
“तू माझी फ्रेंड आहेस का दुश्मन?”
“माझं म्हणणे एव्हढेच आहे, बी प्रॅक्टिकल!”
“ठीक आहे, उद्या फर्स्ट फ्लाईटने कोलकात्याला जाते.”
“ये हुई ना बात! लेट अस सेलिब्रेट! कॉल अनिर्बन!”

तिसरे पाउल


सकाळी साडेपाचला उबर करून अनिर्बन आणि शोमा विमानतळाकडे रवाना झाले आणि मी प्रथम किचन आवरायला घेतले. मी सकाळी साडेपाच वाजता किचन आवरते आहे हे जर मातोश्रींनी बघितलं असतं तर नक्कीच चक्कर आली असती तिला! सिंक मधील भांडी धुवून जागेवर लावली. कालचे पार्टीचे ग्लासेस कपाटात ठेवले, दोन्ही बेडरूम मधील बेड शीट्स बदलल्या आणि घराचा कचरा काढला. मुलगा बघायचाच आहे तर कांदेपोहे का नको असे म्हणून पोह्यांची तयारी केली. आता कांदेपोहे म्हटल्यावर मला ट्रॅडिशनल साडी नेसायची लहर आली. नुपूर, माझ्या मैत्रिणीच्या लग्नात एक पिंक डिझायनर साडी मी नेसले होते. त्यावर घालायला डायमंडचा सेट देखील तयार होता. सर्व तयारी झाल्यावर मी एक सेल्फी काढून आईला पाठवली, त्याच्यावर तिचा, हा कोणाचा फोटो आहे? पण खूपच छान, असा रिमार्क देखील आला.

दहा वाजता विजय दारात हजर झाला. मला बघून दारातच, “वॉव, यू आर लुकिंग बियुटीफुल!” असे उद्गार त्याच्या तोडून बाहेर पडले आणि साडीचा गुलाबी रंग माझ्या गालावर चढतोय की काय असेच मला वाटले. इतक्या वर्षात आपल्याला लाजता येतं याची मला प्रथमच जाणीव झाली. स्त्रीचे सौंदर्य साडीतंच खुलून दिसतं असे लोकं म्हणतात ते उगाचच नाही!

मला माझ्याच सौंदर्याची नशा चढली होती आणि विजयाच्या डीओडरंटचा गंध त्यात मिसळला होता की काय कोण जाणे! पण गप्पा मारता मारता दीडतास कसा गेला ते समजलेच नाही. विजय दिसायला स्मार्ट तर होताच पण शिवाय अतिशय मृदुभाषी आणि डाऊन टू अर्थ असा मुलगा होता. करियर पण छान चालली होती. वडील लहानपणीच गेले होते आणि आई त्याच्या बरोबरच रहात होती. आमच्या खाण्यापिण्याच्या सवयी पण एकसारख्याच होत्या. नकळत कुठेतरी माझ्या मनात विजयच्या नावापुढे टिकमार्क लागला होता. आपापल्या पेरेंट्स बरोबर पुन्हा भेटूया असे ठरवून विजयने मला बाय केले.

पाऊल चौथे


विजयाला भेटल्यावर संजयला भेटायची माझी उत्सुकता जरा कमीच झाली होती. पण ठरवल्या प्रमाणे भेटणे भाग होते.

वेळेअभावी त्याच दिवशी संध्याकाळी संजय आमच्या घरीच आला. त्यामुळे आईबाबा पण हरखून गेले होते. पुन्हा एकदा संध्याकाळी कांदेपोह्यांचा कार्यक्रम झाला. पण त्यात सकाळची एक्साइटमेंट मात्र नव्हती. निदान माझ्याकडून तरी! प्रत्येक वेळेला नकळत संजयची तुलना मी विजयशी करत होते आणि दरवेळी विजयच सर्व दृष्टीनी उजवा वाटत होता. तसे बघितले तर संजयमधे काहीच कमी नव्हते. पण तरीदेखील...!

संजय निघून गेल्यावर मी मिस्टर आणि मिसेस सह्स्रबुद्धेना विजयबद्धल माहिती सांगितली आणि माझा टिकमार्क पण सांगितला. आईबाबा तर माझ्या आधीच गुडघ्याला बाशिंद बांधून तयार होते. आपण उद्याच विजयच्या आईला भेटूया असेच त्यांचे म्हणणे होते. मी कसंबसं त्यांना थोपवले.

पाउले चालती (पाच व सहा)


आता प्रश्न असा उपस्थित झाला की उरलेल्या तीन मुलांना भेटायचे की नाही? जर माझा निर्णय झाला असेल तर उगाच का भेटायचे? पण मुळात माझा निर्णय झालाय का? मी अजूनही थोडी साशंक होते. पण सुदैवाने याचे उत्तर सोपे होते. तिघांपैकी श्रीकांत आणि विक्रांत अमेरिकेत रहात होते. त्यामुळे त्यांच्याशी स्काईपने ई-भेटच करायची होती. तेव्हा पुढच्या शनिवार व रविवारी ही कामे करण्याचे ठरवून मी मुंबईला परत आले. दारातच शोमाची आणि माझी गळाभेट झाली, म्हणजे जवळजवळ गळा दाबून शोमाने मला लग्नाआधीच वर पोचवण्याची व्यवस्था केली होती. मी कशीबशी तिच्या मिठीतून माझी सुटका करून घेतली. माझ्या अंदाजाप्रमाणे तिच्या वडिलांनी परिस्थिती पाहून शोमाच्या लग्नाला परवानगी दिली होती. हल्लीचे आईवडील बरेच सुधारले आहेत पूर्वीपेक्षा!

सोमवारी सकाळीच विजयचा ऑफिसमध्ये फोन आला. म्हणजे आग दोनो तरफ बरोबर लागली होती तर! हाय हेलो झाल्यावर आईला भेटायला कधी येताय अशी तिकडून विचारणा झाली. मी देखील लाजत लाजत माझी आई तुझ्या आईला फोन करणार आहे हा निरोप कळवला. लवकरच परत भेटू या वायद्यावर आम्ही फोन बंद केला.

शनिवारी रात्री श्रीकांत बरोबर ई-भेट झाली. बऱ्याच वेळा कनेक्शन जात होते. स्काईप अश्या गोष्टीसाठी वापरण्याची पहिलीच वेळ असल्याने माझा खूपच गोंधळ उडत होता. अगदी आयटी मध्ये असूनदेखील! श्रीकांतची अशी बरीच संभाषणे झाली असावीत. कारण तो सराईतपणे बोलत होता. अर्धातास वैचारिक देवाणघेवाण (मराठीत झटापट म्हणा हवे तर) झाल्यावर आम्ही एकमेकाना बाय केले. हा सर्व प्रकार पाहिल्यावर अश्या पद्धतीने फक्त ई-लग्नच होऊ शकते याविषयी माझी खात्री झाली होती. त्यामुळे विक्रांतला (पाउल सहावे) सॉरी मेसेज लगेचच पाठवून दिला.

पाउल सातवे


आता या गोष्टीला एक आठवडा लोटला आहे. मध्यंतरी मिसेस सहस्रबुद्धेंचा विजयच्या आई बरोबर फोन वरून संवाद झाला आहे. विजय आणि माझे दिवसाला एकदोन फोन होऊ लागले आहेत. मध्यंतरी एकदा मी, शोमा आणि अनिर्बन कॉफीच्या निमित्ताने विजयला भेटलो. शोमा ज्या नजरेने विजयकडे पहात होती ते पाहून शोमाचं लग्न आघीच ठरलंय हे किती बरं झालं असंच मला वाटले. शेवटची प्रशांतची मुलाखत रद्ध करावी असं मला सारखसारखं वाटत होतं.

परंतु शेवटी आज हा प्रशांत समोर आलेला दिसतोय. मी त्याला लांबूनच हात केला. मला बघून तो माझ्या टेबलाशी आला. मला हेलो म्हणून समोर बसला. प्रशांतशी मी बोलायला सुरवात करणार तेव्हढ्यात माझ्या बाजूला कुणीतरी उभे आहे अशी मला जाणीव झाली. मी मान वर केली आणि मला क्षणभर भोवळंच आली. कारण बाजूला विजय उभा होता. क्षणभर काय बोलावे तेच मला सुचेना. ओठातून शब्दच बाहेर पडत नव्हते.

“तू? त तू... इथे कसा?” माझ्या ओठातून आलेला आवाज माझाच आहे की नाही तेच मला समजेनासे झाले होते. मी धड प्रशांतकडे पण पाहू शकत नव्हते आणि विजयच्या नजरेला पण नजर देवू शकत नव्हते. इकडे आड आणि तिकडे विहीर या म्हणीचा नेमका अर्थ मला तेव्हा समजला. प्रशांत आणि विजयने एकमेकांकडे पाहिले आणि दोघे खोखो हसत सुटले. इकडे माझी अवस्था हसावे की रडावे अशी झाली होती.

“प्रशांत माझा लहानपणापासूनचा मित्र आहे. आपले जवळजवळ ठरले आहे हे त्याला मीच सागितले होते. तो स्वत:च आजची भेट रद्ध करणार होता, पण मीच म्हटले, जरा गम्मत करू तुझी!” विजय म्हणाला.

“गम्मत! नालायक माणसा”, मी टेबलावरचा ग्लास उचलून विजयला फेकून मारण्याच्या तयारीत होते. “मी हा आठवडा कसा काढलाय याची तुला कल्पना तरी आहे का!”
“सॉरी, सॉरी, पण मी तरी काय करू? तू काहीच स्पष्ट बोलत नव्हतीस. मी पण आठवडाभर टेन्शन मध्ये आहे.”
“अरे पण असे निर्णय एका फटक्यात होत नसतात. आयुष्याचा प्रश्न आहे.”
“मान्य आहे मला, पुन्हा एकदा सॉरी!” विजय म्हणाला.

तेव्हढ्यात एक छानशी तरुणी आम्हाला जॅाईन झाली.
“ही मानसी, आम्ही पण दोन दिवसापूर्वी लग्न करण्याचा निर्णय घेतलाय.” प्रशांत म्हणाला.
नंतरचे आमचे दोन तास धमाल गेले. मग मी आणि विजय त्याच्या घरी गेलो आणि त्याच्या आईला भेटलो. पहाताक्षणीच आम्ही दोघी जणू बऱ्याच वर्षांची ओळख असल्यासारख्याच एकमेकांशी बोलू लागलो.

संध्याकाळी आम्ही तिघेही विजयच्या गाडीने पुण्याला आमच्या घरी गेलो. मिस्टर आणि मिसेस सहस्रबुद्ध्यांना हा खराच गोड धक्का होता

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी एक मॅाडर्न मुलगी आहे. अश्या सेमी पण पारंपारिक पद्धतीने लग्न करायला कशी तयार झाले? साधी गोष्ट आहे, लग्न हे केवळ दोघा व्यक्तींमध्ये होत नसते, तर दोन कुटुंबामध्ये होतं अशी माझी समजूत आहे. शिवाय दोन्ही व्यक्ती सर्व प्रकारे एकमेकाना अनुरूप असल्या पाहिजेत. आणि हे ठोकताळे पारंपारिकपणे बघितले तर काय हरकत आहे? आणि जरी मी जुन्या रीतीभाती मानत नसले तरी अशी नव्हे तर तशी का होईना, सप्तपदी झालीच ना!

Comments

गंमतीशीर गोष्ट.प्रत्येक अनुभव वेगळा.पण. शेवट सुखांत....

By : Pratibha Tarabadkar
29/04/2023 2 : 00 : 48 PM

वेगळी सप्तपदी आवड्ली

By : शितल
30/04/2023 3 : 04 : 26 PM

वेगळीच सप्तपदी आवडली

By : शितल
30/04/2023 3 : 05 : 43 PM

ही नवीन सप्तपदी एकदम मस्त, शेवटचा ट्विस्ट भारी

By : Devendra Buddhikot
30/04/2023 4 : 10 : 26 PM

Mast enjoyed

By : Sandhya
30/04/2023 11 : 47 : 08 PM

रियली एन्जॉय मस्तच की सप्तपदी

By : pratibha jayant sumant
02/05/2023 4 : 28 : 13 PM

Masta👌

By : Mrunal Dani
03/05/2023 2 : 09 : 32 PM
Leave a comment
*Comment :
*Name :
Email :



Share This Article