मुंबई-ठाणे की पुणे?: भाग दोन


मुंबई-ठाणे की पुणे?: भाग दोन

शशांक पुरंदरे

मला समजायला लागल्यापासून वयाच्या साधारण पंचेचाळीस वर्षांपर्यंत माझे आयुष्य चुनाभट्टी-चेंबूर मधे गेले. आपण ज्या शहरात, किंबहुना शहराच्या ज्या भागात जगलो, घडलो, त्या भागाबद्दल साहजिकच आपल्याला आपुलकी, जवळीक वाटू लागते. त्या भागात राहण्याचे फायदे किंवा तृटी आपल्या अंगवळणी पडू लागतात. मला कल्पना आहे की मुंबईच्या दक्षिण भागात राहणारे उपनगरात यायला निरुत्साही असतात. इतकेच नव्हे, तर पश्चिम उपनगरातील लोकं पूर्वेकडे किंवा पूर्व उपनगरात राहणारे पश्चिम उपनगरात जायला देखील नाखूष असतात.

खरी गोष्ट अशी आहे की आपण जिथे राहतो तिथले होऊन जातो. तिथले रस्ते, तिथली दुकानं, दूधवाला, पाववाला, इस्त्रीवाला या सगळ्यांची आपल्याला सवय होते. आपल्या शेजाऱ्यापाजऱ्यांशी आपले ऋणानुबंध निर्माण होतात. एखाद्या आपत्कालीन प्रसंगी तेच प्रथम मदतीला धावून येतात.

आपली मुलेदेखील तिथल्या मित्रमैत्रीणींमधे रममाण होतात.

अशा परिस्थितीत त्या भागातून इतर ठिकाणी स्थलांतरित होण्याचा निर्णय नेहमीच कटू असतो. बहुतेक वेळा लग्न, नोकरी, मुलांची शिक्षणे, रहात असलेल्या जागेपेक्षा मोठ्या घराची गरज आणि आपली आर्थिक परिस्थिती इत्यादी कारणांमुळे हे निर्णय घेतले जातात.

सारासार विचार केला तर असे लक्षात येते की मुंबई ठाणे किंवा पुणे या शहरांमध्ये फारसा फरक राहिलेला नाही. सर्वच शहरांमध्ये वाहतूक, गर्दी यांच्या समस्या सारख्याच आहेत. दक्षिण मुंबईचा अपवाद वगळला तर सगळीकडे नवीन घरे तेव्हढीच महाग आहेत. सर्व शहरात सोयी वा गैरसोयी सारख्याच आहेत. फक्त हवामानामधे मात्र फरक आहे.

एका शहरातून दुसऱ्या शहरात स्थलांतरित होण्याचा निर्णय तरुण वयातच घेतलेला बरा! साठीनंतर वा निवृत्तीनंतर केलेला बदल कालांतराने योग्य ठरला तर ठीक, नाहीतर शेलारमामांनी परतीचे दोर आधीच कापलेले असतात.

आमचे एक स्नेही एकेदिवशी उठून दुसऱ्या शहरात रहायला गेले. त्यांचे आणि शहराचे नाव गोपनीय ठेवण्यात येत आहे. ही फाईल नव्याण्णव वर्षांनीच खुली करण्यात येईल! पण सांगायचा मुद्दा हा की आज तीन वर्षांनंतरही ते नवीन दिल्या (घेतलेल्या) घरी सुखी व आनंदी आहेत. पण हे भाग्य सर्वांनाच लाभेल याची शाश्वती नाही. तेव्हा विचार करुनच निर्णय घ्यावा!

मी आधीच्या लेखात वाचकांना विचारले होते की पुणे (इथेही पहिले मानकरी हेच आहेत!) मुंबई की ठाणे? आणि मला अपेक्षित अशीच उत्तरे आली. ठेविले अनंते तैसेची रहावे या चालीवर आपण राहतो तेच शहर श्रेष्ठ आहे असे ठासून सांगितले गेले. या नियमाला एकही अपवाद सापडला नाही.

तेव्हा या ओपिनियन पोलला मी लॅाक करायचे ठरवले आहे.

एकदम सही जवाब।

Comments

सही है

By : Veena kadekar
06/02/2026 2 : 52 : 54 PM
Leave a comment
*Comment :
*Name :
Email :



Share This Article