मुंबई-ठाणे की पुणे?


मुंबई-ठाणे की पुणे?

शशांक पुरंदरे

कुणीतरी म्हटले आहे, किंबहुना सगळेच म्हणतात, की पुणे तिथे काय उणे! वास्तविक हा ‘सुविचार’ मी फारसा कधी मनाला लावून घेतला नव्हता. पण हल्ली झालंय काय की जो उठतो सरळ मुंबई-ठाणे सोडून पुण्याला कायमचा स्थलांतर करु पाहतोय. हे देखील मी फारसे मनावर घेतले नसते परंतु आता माझे जीवश्च कंठश्च आप्तेष्ठ देखील मुंबईला रामराम ठोकून पुनेष्ठ होत आहेत आणि वर मला देखील तेच करण्याचा आग्रह करत आहेत. पण मला समजत नाहीये की असे पुण्यात काय आहे जे मुंबई-ठाण्यात नाही. मी मुंबई बरोबर ठाण्याला जोडतोय कारण ठाणे मुंबईचे अविभाज्य अंग आहे. ठाण्याची सर नवी मुंबई किंवा विरारला नाही.

तर, मी ठरवलं की एकदा बघूया तरी की पुण्यात काय आहे जे मुंबईत नाही. यापुढे मी मुंबई लिहिलं तरी त्यात ठाण्याचाही समावेश आहे हे वाचकांनी कृपया ध्यानात ठेवावे.

तर अर्थातच पहिला मान पुण्याचा! आता तुम्ही म्हणाल की पूर्ण लेखाचे सार या एका वाक्यातच आहे, पण जरा थांबा!

पुणे म्हटले की प्रथम डोळ्यासमोर येतात ते शनिवार वाडा, पर्वती, फर्ग्युसनची टेकडी वगैरे वगैरे.

याउलट मुंबईत शनिवार काय कुठल्याही वारांचा वाडा नाही आणि पेठादेखील नाहीत. किंबहुना, मुंबईत सोमवार मंगळवार असे वारच नसतात. इथे मंडे टू फ्रायडे हे वीकडे आणि सॅटर्डे-संडे हे वीकएंड असतात जेव्हा मुंबईकर लोणावळा अलिबाग अथवा पुण्याला देखील जातात. आणि पेठेत पेठ सदाशिव पेठ! त्याची बरोबरी अख्ख्या विश्वात कुणी करु शकत नाही.

पर्वती, सिंहगड ही पुणेकरांना वर चढण्यासाठी बांधलेली ठिकाणे आहेत. फर्ग्युसनची टेकडी ही फक्त तरुण मुलामुलींसाठी आरक्षित आहे. आशाताईंना देखील ‘चांदण्यात फिरताना’ याचीच आठवण येते. यावर किती हृदये जुळली आणि किती तुटली याची गणती त्या स्वर्गात गाठी बांधणाऱ्याकडे देखील नसेल. यासाठी मुंबईत चौपाट्या आहेत. पण फर्ग्युसनच्या टेकडीची उंची त्या गाठू शकत नाहीत.

वर चढण्याकरता मुंबईकरांसाठी फक्त रेल्वे स्टेशनचे जिनेच आहेत. जिन्यावर हृदयांची देवाणघेवाण झाल्याचे माझ्यातरी ऐकीवात नाही. पूर्वी दुमजली बसेस होत्या पण त्यादेखील हल्ली अपवादानेच दिसतात. पण वरच्या मजल्यावर पुढच्या सीटवर बसून मुंबई बघण्याची मजा पुणेकरांना कधीच घेता आली नाही हे मात्र नक्की!

चढू शकणारे सर्व पुणेकर दर रविवारी सिंहगड सर करतात. इतर पर्वताीवर जातात. अनेक वर्ष तुळशीबाग ही सारसबाग किंवा संभाजी बागेसारखी बाग आहे असा माझा समज होता पण तो माझ्या बहिणीने आणि पत्नीने दूर केला. सर्व गृहपयोगी आणि पुरुषांच्या दृष्टिकोनातून निरुपयोगी वस्तु मिळण्याचे हे संपूर्ण महाराष्ट्रातील एकमेव ठिकाण आहे.

पुणे हे देवादिकांचे शहर आहे, पण त्यांची नावे अनाकलनीय आहेत. उदाहरणार्थ , बटाट्या मारुती, भांग्या मारुती, जिलब्या मारुती इत्यादी.

कसबा गणपती, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती यांची बरोबरी फक्त मुंबईचा सिध्दिविनायकच करु शकतो.

पुण्यातून मुळा मुठा नद्या वाहतात. त्यावर अनेक पूल बांधले आहेत. लकडीपूलावरुन पावसाळ्यात नदीतून वाहणाऱ्या पाण्याची मौज पाहता येते तर पाण्याची पातळी मोजण्यासाठी भिडेपूल बांधला आहे. तो पाण्याखाली गेला की पुणे महानगर पालिका पुण्यात पूरसदृष्य स्थिती निर्माण झाली आहे असे घोषित करते. मुंबईत असे नावाजलेले पूलच नाहीत. फक्त पंचावन्न उड्डाण पूल आहेत पण हे नक्की कुणी बांधले या विषयावर मुंबई विद्यापीठ विद्यावाचस्पतीची पदवी देऊ इच्छित आहे, पण अजूनही संशोधन सुरु आहे.

याउलट पुणे विद्यापीठ रस्त्यावर बांधलेले उड्डाणपूल रातोरात गायब झाल्याची आख्यायिका आहे.

मुंबईतील पंचावन्न पुलांवरून वाहणारी वाहतूक बऱ्यापैकी शिस्तबध्द आहे पण याबाबतीत पुण्याची बरोबरी कुणीच करु शकत नाही. पूर्वी पुण्यात सायकलींचे साम्राज्य होते. नंतर त्यांची जागा बजाजच्या स्कूटरने घेतली. बजाज स्कूटर रस्त्यात बंद पडल्यास पंचेचाळीस अंशाच्या कोनात वाकडी करुन मग लाथ मारली तर पुन्हा सुरु होते हा शोध पुण्यातच लागला. नंतर पुण्यात रिक्षा आल्या. या सर्वांच्या संगमातून जो तयार होतो त्याला वाहतूक मुरंबा म्हणतात. हा पुण्यातील कुठल्याही रस्त्यावर दिवसाच्या कुठल्याही प्रहरी चाखता येतो.

मेलो तरी बेहत्तर पण डोक्यावर हेल्मेट घालणार नाही हा मराठी बाणेदारपणा पुण्यात जागोजागी दिसतो. रस्त्यावर मिळेल त्या दिशेने मिळेल त्या जागेतून वाहन चालवणे हे शिक्षण पुण्यात बहुतेक वाहतूक परवाना देतानाच दिले जात असावे. दुचाकीवर तीन पेक्षा कमी प्रवासी आढळले तर दंड आकारण्यात येतो म्हणे पुण्यात!

इथे एक किस्सा सांगण्यासारखा आहे. कदाचित ऐकलाही असेल. पुण्यात खूप उन किंवा खूप थंडी असते त्यामुळे दुचाकी चालविणाऱ्या सर्व मुली तोंडाला स्कार्फ बांधून दुचाकी चालवतात. त्यामुळे डोळे सोडून चेहऱ्याचा कुठलाही भाग दिसत नाही. एकदा दोन मैत्रीणींनी वैशालीवर भेटायचे ठरवले. वैशाली फर्ग्युसन समोरचे रेस्टॅारंट आहे. विद्यार्थी कॅालेजमधे कमी आणि वैशालीत जास्ती सापडतात. तर दोन मुसक्या बांधलेल्या मुली वैशालीत आल्या. एकमेकांना हाय करुन समोरासमोर बसून गप्पा मारू लागल्या. नंतर उकडू लागले म्हणून दोघांनीही स्कार्फस काढले आणि एकमेकांकडे बघून दोघीही एकदमच उद्गारल्या, अय्या, तू कोण?? आता बोला !!

पण वाहतूकीच्या बाबतीत ठाणे देखील मागे नाही. हे सर्व पुणेकरांचे गुण ठाणेकऱ्यांनी देखील अंगीकारले आहेत. शिवाय प्रवाहाविरुध्द प्रवास करण्याची ठाणेकरांची जिद्द पुणेकरांमधे देखील नाही.

दोन्ही शहरांच्या हवामानातही लक्षणीय फरक आहे. मुंबईत बाराही महिने अंगातून घामाच्या धारा वाहतात. हल्ली बारा महिन्यात कधीही पाऊस पडतो. मुंबईत रेल्वे वाहतूक बंद झाली की खूप पाऊस झाला आहे असे समजले जाते. अंधेरीचा मिलन सबवे पाणी पातळी मोजण्या करता वापरला जातो. पुण्यात थोडासा पाऊस झाला तरी पुणेकर घरी बसतो, परंतु धोधो पावसातही मुंबईकर मुंबईहून पुण्याला मीटींगला जातो.

पुण्यात हिवाळ्यात प्रचंड थंडी तर उन्हाळ्यात कडाक्याचे उन पडते. पुणेकर त्यामुळे उन्हाळ्यात दुपारी बारा ते चार घराबाहेर पडत नाही तर तो हिवाळ्यात फक्त बारा ते चार मधेच घराबाहेर पडतो. एकंदरीतच बारा ते चार मधे पुणे विश्रांती घेते. मुंबईकर मात्र चोवीस तास पळत असतो. मुंबईकर कायम हाताच्या घड्याळाला बांधलेला असतो तर पुणेकरांची घड्याळाशी काहीही देणेघेणे नसते. पुणेकर अर्धापाऊणतास उशीराला उशीर मानतच नाही.

मुंबईकर सतत काहीतरी कारणाने पुण्याला जात असतो. पुणेकर मात्र अगदी नाइलाज असेल तरच मुंबईला येतो. त्यामुळे मुंबईपुणे एक्सप्रेस वेवर सकाळी पुण्याला जाताना तर संध्याकाळी मुंबईला येताना वाहतूक मुरंबा असतो.

सध्या मोबाईलचा जमाना आहे पण जातीचा पुणेकर स्वतःहून कुणाला फोन करत नाही. मुंबईकर मात्र कधीही कुणालाही कारण नसताना फोन करतो.

जोश्यांची मटार करंजी, काका हलवाईची आंबा बर्फी आणि चितळ्यांची बाकरवडी यांचा पुण्याला रास्त अभिमान आहे. पण हल्ली बाकरवडी संपत नाही, दुपारी एक ते चार मधे देखील मिळते आणि आता तर चितळ्यांच्या मुंबईतही शाखा आहेत.

अरे हो, मुंबई-ठाण्यात काय आहे ते लिहायचे राहिलेच की!

राणीच्या स्वागताकरता बांधलेले गेटवे ॲाफ इंडिया, १८५३ साली तयार झालेले बोरीबंदर स्टेशन, जे आत्ताचे छत्रपती शिवाजी महाराज स्टेशन म्हणून ओळखले जाते, कुलाब्याचे म्युझियम, तरुणाईला धो धो पावसात हातात हात घालून फिरण्याला आमंत्रित करणारा मरीन ड्राईव्ह, मलबार हिल, आता नवीनच झालेली सी लिंक, पश्चिमेला असलेला अरबी समुद्र, लिहावं तेव्हढं थोडं आहे. आणि हो, माधुरी देखील इथेच राहते व अमिताभ देखील!

ठाणे स्वतःच एक वेगळे शहर आहे, जिथे गाडीपासून साडीपर्यंत सर्व काही मिळते. स्टेशन रोड म्हणजे मिनी तुळशीबागच आहे. आता चितळेही आलेत इथे!

फक्त ठाणे शहरात तीस नैसर्गिक तलाव आहेत आणि चढायला येउरचा डोंगरही आहे ज्याच्या पायथ्याशी अस्मादिक वास्तव्याला आहेत. कधीतरी बिबटे देखील इथल्या मॅालमधे फेरफटका मारतात. इथली हवा पण छान आहे. हे सर्व सोडून पुण्याला येऊ म्हणताय?

स्थूल मानाने या विषयावर इतका उहापोह केल्यावरही मला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर सापडलेले नाही, पुण्याला जावे की ठाण्यात रहावे? आपल्याला उत्तर मिळाले तर जरूर कळवा. नाहीतर मला तीन लाईफलाईन्स वापराव्या लागतील.

एक म्हणजे वाचकांची मते. चार पैकी दोन हा पर्याय इथे लागू पडत नाही. आणि तिसरा म्हणजे मित्राला फोन करणें. पण मित्र कुठला निवडायचा? मुंबईचा की पुण्याचा?

Comments

नेहेमीप्रमाणे लेख सुरेख. मुंबईत कोळीवाडा आहे तसेच मुठा नदीवर मात करणारी मिठी नदी आहे. त्यामुळे तुम्ही मुंबईतच रहा

By : Deepak Tikekar
01/02/2026 09 : 36 : 48 AM

मस्तच.. thane pune mumbai..alernate week रहावे

By : मिलिंद कुलकर्णी
01/02/2026 10 : 02 : 15 AM

Nice discussion. Fantastic readable font. Dhanyawaad. My pick is today Thane is becoming the star attraction with dreams of a metro in vision whereas Pune is already sailing in metro connection

By : Subhash
01/02/2026 10 : 24 : 46 AM

पुण्यात. प्रश्नच नाही

By : Sanjay Orpe
01/02/2026 12 : 39 : 37 PM

खुप गमतीशीर आणि अचुकपणे तिन्ही शहरांची वैशिष्ठे मंडळीत. I think in whichever of these 3 cities one is living, one should count themselves as blessed.

By : Sheela Bahadkar
01/02/2026 4 : 44 : 08 PM

यथोचित वास्तव वर्णन. पण तरीही मला वाटतं की धबधगीच्या पुण्यापेक्षा ठाणच बरं.

By : कृपा घाग.
01/02/2026 7 : 43 : 42 PM

मस्त लिहिला आहे लेख . ठाण्यात सांस्कृतिक कार्यक्रम (पुण्याचा वारसा) आहे. ठाण्यात काही उणे नाही.

By : Mrunal
02/02/2026 11 : 35 : 57 PM

मस्तच मिलिंद छान वाटलं लेख वाचून असच लिहिता रहा

By : Meena Shreesh Ghatpande
03/02/2026 10 : 56 : 03 PM

खूप छान लिहिले आहे.

By : Veena kadekar
06/02/2026 2 : 50 : 40 PM

छानच

By : नरेश कदम
06/02/2026 6 : 18 : 43 PM
Leave a comment
*Comment :
*Name :
Email :



Share This Article